दिवसरात्र एकच धास्ती! कोरोना ,कोरोना आणि कोरोना...अशा स्थितीत समाज मनाची स्थिती कशी असेल किंवा समाजाची क्रियाशीलता संपते की काय असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. या महामारीला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकारने संसर्गरोग प्रतिबंध कायदा,आपत्ती व्यवस्थापन कायदा देशभर लागू केला आहे. यासोबतच नागरी प्रतिबंधासाठी स्थनिक जिल्हा प्रशासनांकडून ही आठ दहा अन्य कायद्यानुसार आपले अधिकार वापरले जात आहे, हा प्रकार म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था होऊन बसली आहे. देशाची व नागरिकांसाठीचे विशेषतः इंग्रजांच्या जाचक व त्याहून आपले नागरी अधिकार शून्य करणारे कायदे हे समाज हिताचे नसताना ते वापरले जात आहेत, हे दुर्दैव आहे.
![]() |
| फोटो:फाईल |
या संकटात एवढे सर्व कायदे वापरुनही प्रशासकीय भोंगळ कारभार कुठेही रोखता आला नाही. याच आत्मपरिक्षण हे सर्व कायदे वापरत असलेल्या राजकिय, प्रशासकीय यंत्रणेने जरुर करावेत.या दरम्यान ६३ दिवसात अनेक गोष्टी समोर आल्या पण अगदी आणीबाणीचे कायदे हे समाजाला शिस्त लावण्यासाठी आहे की धमकवण्यासाठी? हे उमजू शकले नाही. त्यावर चर्चा ही होतांना दिसली नाही. प्रवासी मजुरांच्या विषयावर तर सरकार चांगलचं तोंडघशी पडलं. त्यामुळे सुुुुरुवातीला जो आविर्भाव दिसत होता तो कमी झाला. आणखी एक उदाहरण समोर आले ते म्हणजे संस्थात्मक विलगीकरण हा प्रकार जणू त्या नागरिकाने मोठा गुन्हा केल्यागत आपण त्याच्याकडे पाहतोय, त्याला शिक्षा दिलीच पाहिजे असा आविर्भाव ही समाजात बघायला मिळतो, मात्र या संदर्भात हळूहळू जनजागृती आणि आवाज उठवल्याने देशभरातील स्थानिक जिल्हा प्रशासने भानावर आली. आता सार्वत्रिक टीकेची झोड उठल्याने जिल्हा प्रशासनं आपली जबाबदारी गावकारभाऱ्यांकडे सोपवत मान सोडवून घेत आहे.
आता या विलगिकरणातील विस्कळीतपणाच उदाहरण द्यायच झाल तर अनेक गावात हा पोरखेळ दिसून आला. गावात काही ठिकाणी १४ दिवस तर काही ठिकाणी १० दिवस ठेवले जात आहे. त्या लोकांची गावातील पोहच कशी आहे यावर हे विलगीकरण अवलंबलेलं आहे. विशेष म्हणजे या संस्थात्मक विलगीकरण केंद्रात सर्व समदुखी असल्याचे जाणवलं. तसेच सर्वाना आपल्या घरुन जेवण घेऊन येणे सर्वानाच शक्य आहे का? लक्षण आढळल्याशिवाय कुणाचीही चाचणी करायची नाही,दुसरे ज्याना आपल्या घरात अलग रहण्याची सोय नाही.असा नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण केन्द्रात ठेवणे सोयीचे आणि किती गरजेचे आहे?ज्यांच्याकडे सोय सुविधा आहे.त्याना याठिकाणी ठेवून काय साधले जात असे अनंत प्रश्न आहेच,कारण दिवसभरात किमान दोन वेळा या व्यक्तीशी परिवारातील सदस्याचा संपर्क येतच आहे. तेव्हा त्यांना संसर्ग होणे शक्य नाही हे समजने चुकीचे आहे. त्यामुळेच स्थानिक जिल्हा प्रशासनाने याबाबत निश्चीत व योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहे.
माधव ओझा, ज्येष्ठ पत्रकार शिर्डी
