मुंबई|मालेगाव| भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असतांना नाशिकच्या भूमिपुत्रास वीरमरण प्राप्त झाले. सचिन मोरे असे शहीद जवानाचे नाव असून तो मूळचा मालेगाव साकुरी झाप येथील आहे.
अगदी सामान्य परिस्थिती असलेलं त्याचं कुटुंब मालेगाव साकुरे येथे राहतं, वडील,आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. सुरुवातीपासूनच त्याला देशसेवेची आवड होती,त्यामुळे सचिन याने देशसेवेचे व्रत अखेरपर्यंत जोपासले, त्याच्या देशाप्रती सेवाभावीवृत्तीचा घरच्यांसह गावकऱ्यांना ही मोठा अभिमान वाटे. गलवान खोऱ्यात पुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान चीनने रोखून धरलेलं नदीचं पाणी अचानक सोडल्याने याठिकाणी पाण्यात अडकून पडलेल्या सैनिकांच्या मदतीला तो पाण्यात उतरला होता. मात्र त्यात त्याला वीरगती प्राप्त झाली, हे वृत गावी पसरताच गावावर शोककळा पसरली. देशसेवेचं कर्तव्य बजावणारा शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राच्या मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील भारतीय लष्कराचे जवान सचिन विक्रम मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावीत असताना वीरमरण प्राप्त झाल्याचे समजून अतिशय दु:ख झाले. हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी ही श्रद्धांजली वाहिली. देशाच्या सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतांना नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे सुपुत्र सचिन मोरे यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे दुःखद वृत्त समजले, मी सचिन मोरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मी व माझे कुटुंबीय मोरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून शहीद मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
