नाशिक| प्रतिनिधी| भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात कर्तव्य बजावत असतांना नाशिकच्या मालेगाव साकुरी येथील सचिन मोरे यांना वीरमरण प्राप्त झाले. शहीद सचिन मोरे यांच्या मूळगावी आज सैन्यदलातर्फे मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यास आले. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, खा. भारती पवार, सुभाष भामरे आदींसह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.
![]() |
| शाहिद सचिन मोरे यांना अखेरचा निरोप |
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याकडून पुलाचे बांधकाम सुरू आहे, या ठिकाणी सचिन मोरे सेवा बजावत होते. याच दरम्यान या भागातील गलवान नदीचे चीनकडून रोखून धरलेले पाणी अचानक सोडण्यात आल्याने पाण्याची पातळी वाढली, त्यात दोन जवान वाहून जात होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सचिन मोरे यांनी प्रयत्न केला, त्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.
![]() |
| अंत्यदर्शनासाठी ठेवलेले पार्थिव |
त्यांच्या पार्थिवावर आज मुळगावी साकुरी झाप येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यावरुन त्यांचे पार्थिव आज मूळगावी आणण्यात आले. याप्रसंगी रस्त्याचा दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली, वीरजवान सचिन मोरे अमर रहे अमर रहे असा जयघोष सुरू होता. फुलाने सजलेला रथ जवळ येताच त्यांची आई आणि पत्नीने एकच हंबरडा फोडला कसे बसे कुटुंबीयांना सावरत त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी गावकरी आणि मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
![]() |
| श्रद्धांजली अर्पण करताना पालकमंत्री ना. छगन भुजबळ |
यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, खा.सुभाष भामरे, खा.भारती पवार, आ. सुहास कांदे,माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. पंकज भुजबळ, माजी आ. जयवंतराव जाधव, जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदींनी ही श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी मालेगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांतअधिकारी तहसीलदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, गावकरी उपस्थित होते.
![]() |
| श्रद्धांजली अर्पण करतांना खा. डॉ.भरती पवार |




