नाशिक|प्रतिनिधी|कोरोनाची लढाई अद्याप संपलेली नसून या लढाईशी सामना करतांना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सजग राहून नागरिकांची मदत करावी अशा सूचना देत राष्ट्रवादी अभिप्राय अभियान' मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि सर्व सेलच्या प्रमुखांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अॅड. रवींद्र पगार उपस्थित होते.यावेळी ना.छगन भुजबळ म्हणाले की, कार्यकर्त्यांना नियमित भेटावं अशी इच्छा कायमच असते मात्र सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आज व्हिडिओ द्वारे आपण सर्व जण भेटत आहोत. कोरोनाची ही अत्यंत कठीण अशी लढाई आपण लढत आहोत कारण या आजारावर अजून कुठलाही ठोस इलाज किंवा उपाय सापडलेला नाही अशा गंभीर संकटाचा सामना करत असताना आपली भेट दुरावली असल्याचे त्यांनी म्हटले.
ते म्हणाले की, कोरोनाच्या परिस्थितीत लॉकडाऊन नागरिकांना पूर्व कल्पना देण्याची गरज होती. त्यातून नागरिकांची चांगली सेवा आपण करू शकलो असतो. मात्र आहे त्या ओढवलेल्या परिस्थितीत आपण अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही याचे नियोजन केले. याचा परिणाम म्हणजे अन्नधान्याच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी राहिल्या नाही. हे शासनाला मिळालेलं चांगले यश आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की,कोरोनाच्या अतिशय कठीण परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरे, मास्क वाटप, फेस शिल्ड, सॅनीटायजर, अन्नधान्याचे वाटप करत आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले काम केलं. तसेच आपल्या नेत्यावर पडळकर सारख्या कथित नेत्याने चुकीचे वक्तव्य केल्यावर त्यावर कुठल्याही आदेशाची वाट न बघता आपण निषेध करून प्रतीउत्तर दिलं त्याबद्दल आपला आभारी आहे. मात्र कोरोनाची लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असून गावपातळीवर त्यासाठी नियोजन करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय मोहीम, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांकडून राबविण्यात येत असलेले विविध कार्यक्रम, रक्तदान शिबिरे यांचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय मोहिमेत सहभागी होण्यासाठी दि.३० जूनपर्यंत या http://bit.ly/RashtravadiPakshAbhipraay लिंक वरील माहिती भरून सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनापासून राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानास सुरूवात झाली आहे. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवला असुन राज्यात आतापर्यंत विविध माध्यमातून ५ लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता आले असल्याने या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उभारणीस योगदान दिले आहे अशा प्रत्येकाचे म्हणणे जाणून घेतले जात आहे. तसेच मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा स्तरावरील पक्षाचे सर्व कार्यकर्ते, गाव व बूथ कमिटीचे कार्यकर्ते व अन्य पदाधिकाऱ्यांकडुन सूचना मागविण्यात येणार आहेत. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी इतक्या मोठ्या पातळीवर मोहीम हाती घेणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यानुसार पक्षाच्या सदस्यांना 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय' या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

