नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून विविध विद्याशाखेतील सुमारे 11 हजार 500 विद्यार्थ्यांना मंगळवार, दि. 30 जून 2020 रोजी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांत विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित साजरा करण्यात येतो.
![]() |
| फोटो: फाईल |
विद्यापीठाचा पुरवणी दीक्षांतास मा. कुलपती तथा मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. सन 2018 च्या हिवाळी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व दि. 29 जून 2020 पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत मध्ये पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्याप्रमाणे दरवर्षी दोन वेळेस पदवी प्रदानाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते जाहिरपणे पदवी प्रदान करण्यात येते तर पुरवणी दीक्षांत किंवा मिनी कॉन्व्होकेशन मध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना पदवी प्रदान करण्यात येते.
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या पुरवणी दीक्षांत उपक्रमात सन 2019 च्या हिवाळी सत्रात उत्तीर्ण झालेले पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच दि. 29 जून 2020 पूर्वी पीएच.डी. जाहिर झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर सन 2018 हिवाळी सत्रातील इंटरर्नशिप पूर्ण झालेले सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी व फेलोशिप आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे सुमारे 11 हजार 500 पेक्षा अधिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
पुरवणी दीक्षांत विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्र पोस्टाव्दारे संलग्नित महाविद्यालयाकडे पाठविण्यात येते. विद्यार्थ्यांनी ती संबंधित महाविद्यालयातून प्राप्त करावीत असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावरुन विहित नमुन्याती अर्ज डाऊनलोड करुन तो दि. 26 जून 2020 पूर्वी विद्यापीठाकडे ई-मेलव्दारा सादर करावा. मुदतीत अर्ज सादर करनाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना पुरवणी दीक्षांत पदवी प्रदान केली जाईल असे त्यांनी सांगितले.
पुरवणी दीक्षांत मध्ये पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी अभिनंदन केले.
