- पर्यावरणपूरक 'देव द्या, देवपण घ्या!' या उपक्रमाच्या १० व्या वर्षाची यशस्वी सांगता - TheAnchor

Breaking

September 2, 2020

पर्यावरणपूरक 'देव द्या, देवपण घ्या!' या उपक्रमाच्या १० व्या वर्षाची यशस्वी सांगता

नाशिक|सोशल डिस्टींक्शनचे नियम पाळत, फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझरचा वापर करत  १० व्या वर्षीचा देव द्या, देवपण घ्या उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे घातले होते. घरगुती गणेशोत्सवातील गणेश मूर्ती  दान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत होते. तसेच गणपती मूर्तीवर देखील सॅनिटायझरची फवारणी केल्यानंतरच ती स्वीकारण्यात येत होती.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे विद्यार्थी कृती समिती तर्फे गेल्या १० वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” हा उपक्रम राबविण्यात येतो. गणेशोत्सवातील १० दिवस विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते. नाशिकच्या गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला.

विसर्जनाच्या दिवशी सकाळी ८ वाजेपासूनच विद्यार्थी कृती समितीचे कार्यकर्ते चोपडा लाँन्सजवळील गोदापार्कच्या प्रवेशद्वाराजवळ तयार करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करीत होते. पांढऱ्या रंगाचे शर्ट, फेस शिल्ड, फेस मास्क व हातमोजे घातलेले हे कार्यकर्ते नाशिककरांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिक मोठया संख्येने गणेश मूर्ती दान करत होते. या मुर्ती अत्यंत भावपूर्ण वातावरणात महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येत होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, राहुल मकवाना, वैष्णवी जोशी, जयंत सोनवणे, संकेत निमसे, मोनाली गवे, तुषार गायकवाड, रोहित कळमकर, स्नेहल उफाडे, कोमल कुरकुरे, अविनाश बरबडे, भावेश पवार, शुभम पगार, जयश्री नंदवानी, अमोल भांड, राहुल पवार, निखील देशमुख, दुर्गा गुप्ता, अपूर्व सोनवणे, ललित पिंगळे, सागर कुलकर्णी, विकास ओढेकर, योगेश निमसे, मंगेश जाधव, अतुल वारुंगसे, दिगंबर काकड, मनोज पाटील, गौरव पाटील आदींनी परिश्रम घेतले. देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमास १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.अभिनेता अभिजीत खांडकेकर यांनी देखील देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमात सहभागी होत आपल्या घरगुती गणेशोत्सवातील मुर्ती विद्यार्थी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केली.

 देव द्या, देवपण घ्या उपक्रमांर्तगत गणेश मूर्ती स्वीकारताना विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार व कार्यकर्ते दिसत आहेत.