पांडुरंग सोडून गेला यावर अजूनही विश्वास बसत नाही. चांगला सहकारी आणि मूळात उत्तम माणूस...कायम हसणारा, संयमी, कधी कुणाला न दुखावणारा पांडुरंग.. मित्रा मनाला चटका लावून गेलास तू.. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं महानगर असलेल्या पुण्यात पांडुरंगला वाचवण्यासाठी प्रशासन कमी पडलं यापेक्षा दुर्देव काय म्हणता येईल..? पेशंटसाठी ऑक्सिजन बेड न मिळणं, दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर कार्डियाक ॲम्ब्युलन्सही न मिळणं हे धक्कादायक आहे..
ई.टी.व्ही.मराठी, एबीपी (स्टार)माझा, tv9 मराठी दोन्ही ठिकाणी आम्ही सोबतच काम केले..कायम माती आणि शेतीशी नाळ जोडलेला पत्रकार.. बोलण्यातही गावरानपणा..त्यामुळे एबीपीच्या डेस्कवर आमची चांगलीच गट्टी जमायची.. सातबाराचं बातमीपत्र करत असल्यामुळे पांडुरंग लवकर ऑफिसला यायचा.. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही सोबतच जायचो..
पांडुरंग नगरला रिपोर्टिंगसाठी गेल्यानंतरही मी असाईन्मेंट असल्यामुळे आमचे दररोज बोलणे व्हायचं.. इकडे आता tv9 ला काम करतानाही आम्ही नेहमी बोलायचो.... सुरुवातीलाच पांडुरंगची 'नेते..शरदराव' म्हणून हाक असायची.. आधी घरी काय याची विचारणा करणार.. मग हळूच एखाद्या राहिलेल्या बातमीचा विषय काढायची पांडुरंगची सवय..
शेवटपर्यंत पांडुरंग अत्यंत साधा राहिला.. त्याच्या बोलण्या-वागण्यात कधीच चालूपणा आला नाही.. कुणी कितीही चीडलं, तरी त्याच्या बोलण्यातील संयम सुटला नाही..त्यामुळे भेटताच क्षणी समोरच्या मनात घर करून घ्यायचा..अत्यंत चांगला, मनमिळावू मित्र असा अचानक जाण्यानं खूप वाईट वाटतं आहे.
गेल्या दीड महिन्यातील माझा हा तिसरा पत्रकार मित्र कोरोनानं गिळंकृत केलाय.. नंदुरबारचा जयप्रकाश डिगराळे, नाशिकचा अजय पाटील या दोघा मित्रांचे अगदी कमी वयात कोरोनामुळे निधन झाले.. त्यानंतर आता पांडुरंगच्या अकाली निधनानं तर मन सुन्न झालंय..
पांडुरंगच्या घटनेनं महाराष्ट्रातील मुर्दाड स्थिती उघड झालीय.. त्यामुळे मित्रांनो स्वत:ची काळजी स्वत: घ्या.. आपल्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नाही, हे मनावर बिंबवून घ्या.. काम महत्वाचं आहेच, पण त्याहून जास्त मोल तुमच्या आयुष्याला आहे.. त्यामुळे जराही तब्येत खराब वाटत असेल तर तात्काळ डॉक्टरकडे जा.. ताण घेवू नका.. नकारात्मक विचार करू नका..मित्रांशी, घरच्यांशी बोलत राहा..
मित्रा पांडुरंग, वेळोवेळी तुझी आठवण येत राहिल.. तुझे ते हळूवार बोलणे.. लाईव्हमध्येही आरामात विस्तृत माहिती देणे आठवत राहिल.
शरद जाधव
वरिष्ठ पत्रकार, टीव्ही-९