मुंबई| विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी सोशल माध्यमातून दिली आहे.
ते म्हणाले की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन असे सांगितले.
तसेच राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत.महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन ते लवकरच सर्वांच्या सोबत येतील.दादा, लवकर बरे व्हा असे सांगितले आहे.
