इतिहास नेहमी काही तरी सांगत असतो. इतिहासाची ती हाक तो आवाज आपण ऐकला पाहिजे तर आपले भविष्य चांगले होऊ शकेल.म्हणजेच इतिहास संशोधनाचा एक दुवा असलेल्या एक स्तंभाचे आपण प्रेमी आहोत. नाण्यांतून इतिहासाचे धागे गवसतात.सातवहान कालीन नाण्यांतून व शिलालेखात जसा इतिहास समोर येतो व पर्यावरन सवर्धनाचा आपल्याला संदेशच देत आहेत. तसेच ही नाणी आपल्याला निसर्गाकडेही घेऊन जातात. प्राचीन नाणी व लेणीवरील शिलालेख जणू मानव निसर्गपूजक होता याची साक्ष देतात. नाण्यातून व शिलालेखात दिसणारा त्यावेळचा निसर्ग हा माझ्या विषयाचा हेतू आहे.
निसर्ग हा वैविध्याने भरलेला आहे. इतिहास,भूगोल, निसर्ग, पर्यावरण, समाज, साहित्य,संस्कृती असे अनंत विषय या निसर्गाच्या पोटात दडलेले असतात. सृष्टीतील या अनंत गुपितांचा शोध घेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील असतो. हा शोध फक्त निसर्गावर प्रेम असणारे मंडळीच घेतात अथवा संशोधक निसर्गाचा शोध घेत आहेत, असे नाही तर अगदी दोन हजार वर्षांपूर्वी सत्तास्थानावर अधिराज्य करणाऱ्या राजामहाराजांना निसर्गाने भूरळ घातली होती. सुरूवातीच्या काळात याचे प्रतिबिंब राजेमहाराजांच्या नाण्यांवर उमटलेले दिसते. तर त्यानंतर दोन हजार वर्षांपूर्वी प्राकृतात लिहिल्या गेलेल्या ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथात त्या काळातील समाजजीवन आणि मानवी भाव-भावनांचे तसेच निसर्गाचे यथार्थ चित्रण दिसते. हा ग्रंथ सातवाहन काळातील राजा हाल याने संपादित केला आहे. या ग्रंथात त्या काळातील समाजजीवनाबरोबरच सामाजिक व्यवहार,निसर्ग, छोटी खेडी, शेती, जंगल, नद्या, विहीरी,विंध्य पर्वत, गोदावरी नदी, स्त्री-पुरुष यांच्यातील प्रेम, तसेच शृंगार, हास्य, करूण आदी रसांचाही समावेश आहे.
इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या-त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. आर्थिक विनिमय, व्यापार- उदीम, सुबत्ता, अवनती,तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्त्वज्ञान,धार्मिक कल्पना, कलाकुसर इत्यादी कितीतरी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. नाण्यांमुळे राजांची नावे, त्यांची क्रमवारी, त्यांचा काळ, राज्यांची स्थाने, त्यांच्या सीमा समजण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू,नाण्यावरील मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्याचे दर्शनी मूल्य, त्याची टांकसाळ या साऱ्या गोष्टी इतिहास उलगडण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. भारतीय नाण्यांचा जन्म इ. स. पूर्व ६ व्या शतकात मानला गेला आहे. ‘आहत’ (Punch Marked Coins)ही सर्वात जुनी भारतीय नाणी. २६०० वर्षांची अखंडित परंपरा भारतीय नाण्यांना लाभली आहे. आदिमानवाच्या काळात चलन नव्हते. त्याची गरजच नव्हती. पण काही प्रमाणात वस्तुविनिमय होता. साधारणत: नवाश्म युगाच्या काळात पशूंना खरेदी-विक्रीतील माध्यम मानले गेले. मुख्यत: गाय हे विनिमय माध्यम होते. गाईप्रमाणे धान्य, नारळ, तंबाखू, चाकू-सुरे, मणी,शंख-शिंपले हेसुद्धा विनिमय माध्यम म्हणून वापरले जात होते. पण धान्य आणि गाय हे विनिमय म्हणून वापरताना समस्या होत्या. या गोष्टी नाशिवंत असल्याने टिकाऊ धातूंचा वापर सुरू झाला. धातूची कडी, अंगठय़ा, गोळे, दागिने इत्यादी वापरले जाऊ लागले. कालांतराने विशिष्ट आकाराच्या, वजनाच्या धातूच्या तुकड्यांवर त्यातील वजन, शुद्धता, मूल्य यांची खात्री देणारी चिन्हं उमटवली गेली. पुढे हे चिन्ह उमटवलेले धातूंचे तुकडे तो- तो राजाच पाडू लागला. त्यांनाच ‘नाणी’ म्हटले जाऊ लागले.
२६०० वर्षांपूर्वी भारतात काशी, मगध, गांधार,पांचाल, कलिंग आदी राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. आहत किंवा Punch Marked Coins या नावाने ओळखली जाणारी ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत प्रामुख्याने चांदीत बनवलेली होती. ती ओबडधोबड होती, पण सारख्या वजनाची होती. त्यात ३०० विविध प्रकार आढळून आले आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशू-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, चित्रे अंकित आहेत. दक्षिणेचे पहिले सम्राट सातवाहन यांची नाणी महाराष्ट्रात नाशिक, नेवासे , कोल्हापूर, तेर,कऱ्हाड, पैठण, चांदा व तऱ्हाळे इ. अनेक ठिकाणी सापडली आहेत. सातवाहनानी मुख्यत्वे तांबे, शिसे आणि कासे इत्यादी धातूंचा उपयोग केला असून, चांदीचा वापर वसिष्ठीपुत्र पुलुमावी (इ. स. १३० ते १५९), वसिष्ठीपुत्र शतकर्णी (इ. स. १५९ ते१६६) व गौतमीपुत्र श्री यज्ञ चित्रीत केलेली थोडी नाणी सापडली आहेत. सातवाहन नाण्यांवर बैल, हत्ती, कासव, व सिंह यासारख्या प्राण्यांच्या कोरलेल्या अक्षरांसहित आकृती, मासे असलेली नदी, विविध प्रकारची झाडे, वृक्ष, सूर्य,डोंगर, पर्वत, बैलांच्या पायांचे ठसे तसेच नदी देवता म्हणजे गोदावरी देवतेचीही प्रतिमा नाण्यावर आल्याचे दिसत ह्या वरून त्याकाळचे राज्यकर्ते जणू निसर्ग सवरधनाचा संदेशच देत असावे. महाराष्ट्रात फारच क्वचित क्षत्रप नाणी सापडली आहेत. या कुळातील व शक राजघराण्यातील नहपना (इ.स. ११०-१२४) या राजानेही निसर्गपूजकचा आपल्या दान धर्मातून दाखवून दिलेली आहे. पांडवलेणीतील लेणी क्रमांक १० मध्ये नहपानाचा जावई ऋषभदत्ताने त्रिरश्मी पर्वतात लेणी व त्याची पाण्याची टाकी खोदविली हे सांगण्यासाठी कोरलेल्या शिलालेखात तीन लाख गाई दान दिल्याचा तसेच बत्तीस हजार नारळीची झाडे दान दिल्याचा उल्लेख आहे.
जुन्नरमध्ये मानमोडी डोंगरावरील अंबाअंबिका लेण्यातील २६ क्रमांकाचे चैत्यग्रुहाच्या चैत्यगवाक्षाच्या डाव्या बाजुला दोन शिलालेख आहेत.
शिलालेखातील पहिला
कोणाचिकसेणिय
उवसको आडुथूम
सको ।। वडालिकाय
करजमुलनिवतणा
नि वीस ।। कटपुतके
वडमुले निवित
णानि (न) व
या शिलालेखाचा अर्थ असा, कोणाचिक श्रेणीक उपासक आडुथूम शक याने वडालिका गावात करंज व्रूक्षासाठी २० निवर्तने व कटपुतक गावात वटव्रूक्षासाठी ९ निवर्तने जमीन दिली. या लेखावरून जगण्यासाठी आवश्यक तसेच निसर्गसंवर्धनासाठी त्यावेळीही राजे महाराजे नियोजन करून वृक्षलागवडीसाठी जमीनींचे दान देत असल्याचे समोर येते.
तर येथीलच दुसऱ्या शिलालेखात
महावेजे गामे जाबभति
उदेसेण नीवतणानि षणुविस
सिधगणे अपराजिते
(नि) असतानि सेलस
मानमुकडस पुरतो
तलकवाडके निवत
ताणि तिनि ।। नगरस
......क.... सेलउदे
सेण निवतणानी बे
शिलालेखाचा अर्थ असा आहे.. महावेज गावातील २६ निवर्तने शेत जंबू वृक्षाची लागवड करण्यासाठी मानमुकड टेकडीजवळ दुसरे एक शेत ताड व्रूक्ष लावण्यासाठी आणि गावाच्या सीमेच्या आतील तीसरे एक शेत साल व्रूक्षाच्या लागवडीसाठी अपराजित संघाच्या सिद्धगणांच्या स्वाधीन केले. या शिलालेखावरून जुन्नरच्या आसपास च्या गावात करंज, वड, जंबू ( जांभूळ?), साल, ताड इ. व्रूक्षांच्या लागवडीसाठी जमिनी दान दिल्या आहेत. तत्कालीन समाजात वृक्षसंवर्धनालाही महत्त्व होते असे वाटते.
म्हणजेच पूर्वीचे राजे निसर्गाला देत असलेले महत्त्व या नाण्यामधून व लेणीमधील शिलालेखात दिसते. निसर्ग हा निर्माता आहे हे हजारोवर्षांपासून मानवावर ठसलेले असून, नाण्यांवरील निसर्गघटकांच्या उपस्थितीमुळे पर्यावरण संदेश मिळत असल्याचेही आता लक्षात घ्यायला हवे. दिल्लीच्या सुलतानांच्या काळात नाण्यांवरील देव-देवता, पशुपक्षी व निसर्ग चित्रे हद्दपार झाली आहेत. आजही नाण्यांवर निसर्ग दिसत नाही. दोन हजार वर्षांपूर्वीची सातवाहन राजांची शिकवण आजही आमंलात आणण्याची गरज आहे. कारण पर्यावरणाचा होत असलेल्या रास थांबविण्यासाठी आताच आपण प्रयत्न करत आहोत असे नाही तर निसर्गसंवर्धनाचे दोन हजार वर्षांपूर्वी देखील जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे दिसते. प्राचीन नाणी आपल्याला निसर्गाकडे जाण्याची एक दिशा देतील, अशी अपेक्षा करतो.
चेतन राजापूरकर,
अभ्यासक, नाणी संग्राहक
नाशिक



