नाशिक| परराज्यात वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना कोविड टेस्टची अट शिथिल करण्याची मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
![]() |
| फोटो:फाईल |
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. सदर नियमावली नुसार राज्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांना कोविड टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आलेली आहे. मात्र हा नियम वाहतूक व्यवसायाला लागू करणे अत्यंत त्रासदायक ठरणार आहे.
वाहतूक क्षेत्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून दररोज हजारो ट्रक राज्याबाहेर जातात आणि राज्यात येतात. अशा परिस्थितीत दररोज चालकांना कोविड टेस्ट करणे बंधनकारक करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ट्रक चालकांना या नियमावलीतून वगळण्यात यावे अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.
