भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माझी पहिली वहिली टूर होती. 2007 साली मी इयत्ता 7 वीला असताना माझा परिवाराने ठरवलं की भगवान गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला भेट द्यायची. यासाठी 6 जुलै 2007 साली आम्ही बुद्धगयासाठी रेल्वेने प्रवास सुरू केला. प्रवासासाठी साधारण 26 तास लागतात. बुद्धगया जाण्यासाठी (बिहार)मध्ये गया जं. रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो आणि तेथून बुद्धगया असा 11 किमीचा संपूर्ण प्रवास सुमो कारद्वारे केला.
गया हे भगवान गौतम बुद्धांचे ज्ञान प्राप्तीचे ठिकाण असून हे जागतिक, ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटक, लोक, धर्मगुरू मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आलेले दिसले. बुद्धगयामध्ये सर्वात मुख्य ठिकाण म्हणजे पिंपळाचे झाड, 2558 वर्षापूर्वी येथे वैशाख पौर्णिमेला झाडाखाली भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती ते झाड आज बघण्यास मिळाल्याचे समाधान लाभले, इथला परिसर 25 एकरमध्ये आहे, येथे भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्तीचा काही काळ घालवला, या परिसरमध्ये सम्राट अशोकाने निर्माण केलेले 120 उंची असलेलं महाबोधी बुद्धविहार आहे. या विहारा (मंदीर)वर ऐतिहासिक नक्षीकाम केलं आहे, त्यात विहारामध्ये भूमी स्पर्श असलेली गौतम बुद्धाची सुंदर मूर्ती आहे, तसेच बाहेरील परिसर खूप सुंदर हिरवाईने नटलेला असून देशी विदेशी लोक या ठिकाणी पूजा व ध्यान साधना करत असताना बघायला मिळाले, हा परिसर बघून खूप छान वाटले व मनाला सुखद अनुभव मिळाला, असे वाटलं की बौद्ध धर्म मानव कल्याण करणारा, मानव मुक्तीच्या मार्ग दाखवणारा व शांतीचा धर्म आहे.
या परिसराच्या बाहेर आलानंतर या ठिकाणी थायलंड,जपान, चीन, श्रीलंका, तिबेट, भूतान, तैवान, म्यानमार आशा अनेक देशांनी इथे अतिशय सुंदर असे बुद्धविहार(मंदिर) बांधलेले आहे. विदेशी लोक येथे भारतीयांचा खुप आदर करताना मला दिसले, येथे विदेशी लोक मला म्हणाले की, ही बुद्ध भूमी असून आम्ही या भारत देशाकडे पाय करून सुद्धा झोपत नाही, त्याचबरोबर येथे चीनने 80 फूट भव्य दिव्य गौतम बुद्धांची बसलेली बुद्धमूर्ती बनवली आहे, ती बघून मला सुखद वाटले.
आम्ही बुद्धगया पासून 2 किमी अंतर असलेल्या "सुजाता गड" या ठिकाणी पोहचलो या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध ज्ञानप्राप्ती आधी थांबले होते. या ठिकाणी सुजाता नाव असलेली एका स्त्रीने भगवान गौतम बुद्धांना "खीर" भोजन दान दिले होते, आज ही बौद्धधर्मामध्ये खिरीला फार महत्त्व आहे. ही जागा पण फार प्राचीन असून बघण्यासारखी आहे. आम्ही सुजाता गडापासून 17 किमी प्रवास करुन तपोभूमी या ठिकाणी पोहचलो, तपोभूमी हे ठिकाण एका डुंगेश्वरी पर्वतावर असून येथे आम्ही थोडं चढूनवर गेलो या ठिकाणी एक गुंफा आहे. येथे भगवान गौतम बुद्धांनी 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली होती, हे ठिकाण बघून आम्हाला खूप समाधान वाटलं. 2 दिवस आम्ही बुद्धगया या ठिकाणी मुक्काम केला.
त्यानंतर आम्ही 65 किमी प्रवास करत बुद्धगया सोडून राजगिर येथे पोहचलो बुद्धकालीन राजगिर मगध राज्याची राजधानी होती, या ठिकाणी राजगिर पर्वत आहे तो पर्वत म्हणजे भगवान गौतम बुद्धांची ध्यान साधना व शिष्यांना प्रवचन देणाची सर्वात आवडती जागा होती, ही जागा बघण्यासाठी सद्या बिहार सरकारने येते रोप-वे झुला उभारलेला आहे. या ठिकाणी वर गेल्यावर ती जागा बघितली, येथे बुद्धांच्या शिष्यांसाठी राहण्याचे ठिकाण होते, या पर्वतावर जपान या देशाने अतिशय सुंदर असे बुद्धविहार उभारले आहे. येथे शाळा, कॉलेजच्या मोठ्या प्रमाणात सहली येत असतात हा परिसर डोंगरांनी वेढलेला असून खूप रमणीय स्थळ आहे. आम्ही खाली आलानंतर 4 किमी अंतर पार केल्यावर रस्त्यामध्ये एक वन होते त्या वनाच नाव 'वेळूवन" असे होते, मगध राज्याचा राजा बिंबिसार हा बुद्धाचा मोठा अनुयायी होता. राजाने भगवान गौतम बुद्धाना दान स्वरुपात दिलेली ही सर्वात प्रथम जागा होय, ही जागा फार मोठी असून या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना प्रवचन देत असत
त्यानंतर आम्ही 18 किमी प्रवास करत नालंदा विश्वविद्यालय येथे पोहचलो या ठिकाणी डोळ्यात मावणार नाही एवढा मोठा परिसर दृष्टीस पडला, या ठिकाणी प्राचीन काळात देशी-विदेशी विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येथे असत. येथे एकच वेळी 10,000 विद्यार्थ्यांना शिक्षण व राहण्याची व्यवस्था होती. या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाचा सर्वात जवळचा अनुयायी सारीपुत्र शिष्याचा स्तुप आहे. नालंदा जळ्याल्यानंतर आता खंदर अवस्थेत आहे. हे खूप सूंदर विश्वविद्यालय होते, येथे कधी तुम्ही आले तर येथे गाईड नकी घ्या, त्यानंतर आम्ही येथे मुक्काम केला
आम्ही 120 किमीचा प्रवास करत नालंदा ते वैशाली येथे पोहचलो, वैशाली हे सर्व प्रथम गणराज्य होते आणि बुद्धाच्या जीवनातील खूप महत्वाचे स्थान होते. या वैशाली नगरीतून भगवान गौतम बुद्धांनी 3 महिन्यापूर्वी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा याच ठिकाणी केली होती, बुद्धांनी सर्वाधिक अनुयायांना येथे प्रवचन दिल होते व सर्व प्रथम बौद्ध धर्मात स्रियांना येथे प्रवेश बुद्धांनी दिला. या ठिकाणी भगवान गौतम बुध्दाच्या एक अस्थीचा भाग आहे, त्यावर एक स्तुप आहे. त्यानंतर वैशालीमध्ये सम्राट अशोकाने एकमुखी सिंह असलेला भारतातला पहिला अशोकस्तंभ ही या ठिकाणी आहे, तसेच बुद्धाचा जवळचा शिष्य आनंद यांचा स्तूप या ठिकाणी आहे. या ठिकाणी नर वधू आम्रपाली या स्त्रीने वैशाली नगरीत आम्रवन हे बुद्धांना दान केलं होतं.
महापरिनिर्वाणच्या शेवटी या ठिकाणी बुद्ध आले होते हे ठिकाणी बघून ऐतिहासिक माहिती ऐकून खूप मन भारावून गेलं. त्यानंतर 50 किमी अंतर पार करत
वैशाली ते केसारिया या ठिकाणी पोहचलो भगवान गौतम बुद्धांनी आपले केस या ठिकाणी काढले होते आज या ठिकाणी सम्राट अशोकाने जगातील सर्वात मोठा भव्य दिव्य स्तुप उभारला आहे, हा स्तुप खूप सूंदर असून या स्तूपाच्या सर्व बाजूला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे.
तसेच आम्ही 120 किमी केशरिया ते कुशीनगर (उत्तरप्रदेश) असा प्रवास करत कुशीनगर या ठिकाणी मुक्काम केला 2ऱ्या दिवशी आम्ही कुशीनगर या ठिकाणी बघण्यासाठी निघालो येथे शाल वृक्षाखाली वैशाख पौर्णिमेला बुद्धाचा महापरिनिर्वाण झालं या ठिकाणी महापरिनिर्वाण बुद्ध विहार(मंदिर) आहे. या विहारात 22 फूट आडवी झोपलेली बुद्ध मूर्ती आहे. या ठिकाणी आलावर प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहत नाही. माझा आयुष्यात या ठिकाणाला खूप महत्व आहे, खूप शांती आणि समाधानाची अनुभूती येथे येते. या ठिकांनी बुद्धांच्या अस्थींच स्तूप आहे, त्याचबरोबर तिथे जवळ रामभार स्तूप आहे, या ठिकाणी बुद्धांना अग्निकवच देण्यात आला होता आणि या ठिकाणी बुद्धाच्या अस्थींचे 8 भागात विभाजन होऊन 8 स्तुप विविध राज्यात बनवण्यात आले होते. काही काळानंतर त्या 8 स्तूपाच्या अस्थी बाहेर काढून सम्राट अशोकाने 80 हजार स्तूपाचे निमार्ण करून बौद्ध धर्माचा जगात प्रचार प्रसार केला. बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार करून सम्राट अशोकाने खूप मोठे योगदान दिले.
आम्ही 170 किमीचा प्रवास करत कुशीनगर ते लुम्बिनी(नेपाळ) या ठिकाणी पोहचलो या लुम्बिनी वनामध्ये महामाया देवी यांनी वैशाख पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धाना शाल वृक्षा खाली जन्म दिला होता. येथे माया देवी विहार (मंदिर)आहे, त्याबरोबर इथे अशोकस्तंभ आहे, महामाया देवी व गौतम बुद्धांनी या ठिकाणी अंघोळ केलेलं एक तलाव अजून आहे. हा परिसर खूप सुंदर असून या परिसराच्या आजू बाजूला सुंदर असे विदेशी बुद्धविहार (मंदिर) उभारले आहे ते बघण्यासारखे आहेे. येथे ही आम्ही एक दिवस मुक्काम केला.
त्यांनतर आम्ही 70 किमीचा प्रवास करत लुम्बिनी (नेपाळ) ते कपिलवस्तू (उत्तरप्रदेश) या ठिकाणी पोहचलो या ठिकाणी शुधोधन राजाचा राजमहल होता या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध लहानसे मोठे झाले तसेच बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर शुधोधन राजाने येथे जवळ विहार(मंदीर)व बुद्धांच्या अनुयायांना राहण्यासाठी कुटी बांधुन दिली होती, बुद्धाच्या अस्थिंचा एक भाग या ठिकाणी आहे ही जागा खूप पवित्र आहे.
त्यानंतर आम्ही 120 किमीचा प्रवास करत आम्ही कपिलवस्तू ते श्रावस्ती येथे पोहचलो या ठिकाणी अनाथपिंडक नावाचा एक व्यापाऱ्याने 100 एकर "जेतवन" ही जागा भगवान गौतम बुद्धांना दान केली होती, या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी आपल्या जीवणातील सर्वात जास्त 24 वर्षावास या ठिकाणी केले आहे. आता हे ठिकाणी खंदर आहे. याठिकाणी बुद्धकालीन विहारात अनुयायांसाठी राहण्याची व्यवस्था असून सभागृह ही या ठिकाणी होते, आपल्याला माहीत असेल अंगुलीमार डाकू व गौतम बुद्धाच संभाषण या ठिकाणी झालं होत, बुद्धाना शरण येत अंगुलीमार याने बौद्ध धर्मात प्रवेश केला. अंगुलीमार डाकूची येथे गुफा बघण्यासारखी आहे, आम्ही श्रावस्ती हे ठिकाण बघून एक दिवस मुक्काम केला.
त्यानंतर आम्ही 270 किमीचा प्रवास करत आम्ही श्रावस्ती ते सारनाथ (वाराणसी) या ठिकाणी पोहचलो या ठिकाणी चौखंड स्तूप, धामेक स्तूप आहे, या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना बुद्ध तत्वज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांनी आपल्या 5 शिष्यांना धम्मचक्र प्रवर्तन संदेश व प्रवचन दिले, यानंतर याच 5 शिष्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार जगभर केला. त्यामुळे हे ठिकाण खूप पवित्र आहे, या ठिकाणी अशोकस्तंभ आहे, त्याबरोबर येथे संग्रहालय ही बघणासारखं आहे. तिथेच आमचा 7 दिवसाचा प्रवास संपला आम्ही वाराणसीवरून परत नाशिकला रवाना झालो.
भगवान गौतम बुद्ध हे असे महान व्यक्ती होऊन गेले की त्यांचा जन्म,ज्ञान प्राप्ती,महापरिनिर्वाण हे सर्व वैशाख पौर्णिमेला झालं आहे.ज्या ज्या ठिकाणी गौतम बुद्धाचे पदस्पर्श झालेले ठिकाण आहे त्या त्या ठिकाणी सम्राट अशोकाने अशोकस्तंभ उभारुन ऐतिहासिक ठिकाण करत आजपर्यंत जपून ठेवले आहे. हे ठिकाण बघणासाठी देशी-विदेशी लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. आपला जीवनात एकदा तरी यावे असे हे ठिकाण आहे.
मी ही सहल केल्यावर माझा आयुष्याला परिपूर्णता लाभल्याचे समाधान मिळाले, माझा जीवनातील ही अनमोल टूर होती, या सहलीनंतर माझं जीवनात अमुलाग्र बद्दल झाला 2007 पासून ते 2021 पर्यंत मी या भूमीत 23 वेळा जाऊन आलो असून या भूमीत सारख सारख जाण्याची इच्छा आजही कायम आहे. ही भारतभूमी खूप पवित्र असून या भूमीमध्ये भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती, महापरिनिर्वाण झालं आहे. त्यामुळे एकदा तरी याभूमीला आपण भेट द्या आणि एका सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्या!
अभिजित भोसले, लेखक
संचालक, सद्धम्म हॉलिडेस् टूर कंपनी
मो- 9762439524





