सन १९२० मध्ये उदोजी मराठा वस्तीगृह बांधण्यात येत होते.त्या वसतिगृहाचा कोनशिला समारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते होणार होता म्हणून म्हणून १५ एप्रिल १९२० मध्ये शाहू महाराज नाशिकमध्ये आले.त्यांचे नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते तो हा क्षण.
महात्मा जोतीराव फुले यांचा सत्यशोधक विचारांचा वारसा नंतर राजर्षी शाहू महाराज यांनी पुढे चालविला. त्यांचा नेतृत्वाखाली अनके सत्यशोधक चळवळीत योगदान देणारे कार्यकर्ते जिल्ह्या-जिल्ह्यात तयार झाले. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात सत्यशोधक समाजाच्या विचाराने तत्कालीन काळात अनेक तरुण भारावून गेले होते. यापैकी पिंपळगाव बसवंतचे कर्मवीर गणपत दादा मोरे हे सत्यशोधक जलसाकार म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख झाली होती. जलसाच्या माध्यमातून सत्यशोधकी विचार त्यांनी समाजात पेरले तसेच, मराठा शिक्षण परिषद मधील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते. नाशिकमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे आणि अन्य सत्यशोधक कार्यकर्ते आणि मराठा पुढाऱ्यांच्या वतीने १९१४ पासून उदोजी मराठा बोर्डिंग सुरू करण्यात आली होती.
या वसतिगृहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीचे क्रांतिकारी पाऊल या कर्मवीरांनी टाकले होते. यासाठीच्या अनंत खस्ता ते घेत होत होते. विद्यार्थी जमा करणे, आर्थिक मदत निर्माण करणे. या वसतीगृहाला कोल्हापूर, बडोदा, धार, ग्व्हालेर संस्थानाचा राजाश्रय तसेच गावागावात ‘तेरावे बलुत’ गोळा करून ते आर्थिकभार सांभाळीत होते. गणपत दादा जलसा सादर करून वसतिगृहासाठी मदत मिळवीत होते. सत्यशोधकीय जलसा च्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांचा “सर्वव्यापी जगत्पती त्याला नको मध्यस्थी” तसेच “शिक्षणाने येते मनुष्यत्व ,पशुत्व हटते पहा’ हा विचार पेरण्याचे काम केले जात असे. याचा त्रास सत्यशोधक कार्यकर्त्यांना झाला. याला कर्मवीर गणपत दादा मोरे हे सुद्धा अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचा मोठा त्रास झाला. पिंपळगाव बसवंत मधील असाच एक वाद पुढे आणून तत्कालीन परिस्थितीमध्ये गणपत दादा यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांना अटक करण्यात आले होती.
सन 1920 मध्ये उदाजी मराठा वस्तीगृह स्वतःच्या जागेत जेव्हा बांधण्यात येत होते. त्याच्या कोनशिला समारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या हस्ते होणार होता म्हणून म्हणून 15 एप्रिल 1920 मध्ये शाहू महाराज नाशिकमध्ये आले. त्यांचे नाशिक मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. अनेक समारंभ ठेवण्यात आले. परंतु त्यांच्या कानी सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा यांच्या कार्याची महती पोहचली होती. म्हणून त्यांना गणपत दादा मोरे यांचा पिंपळगाव ला येऊन सत्कार ,सन्मान करायचा होता म्हणून ते पिंपळगाव बसवंत ला येऊन कर्मवीर गणपत दादा मोरे आणि त्यांच्या पत्नी शारजाबाई मोरे हे बहुजन समाजासाठी घेत असलेल्या कष्टाचे कौतुक करून गणपत दादा मोरे यांची आपल्याबरोबर गाडीत बसून मिरवणूक काढली.त्यांना पाचशे रुपये बक्षीसही दिले.
लेखक :लक्ष्मण घाटोळ-पाटील,
पत्रकार नाशिक
