नाशिक| प्रतिबंध आणि उपचार यांत योगशास्त्र उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-19 संदर्भात ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात होते. या व्याख्यानमालेत बंगळूर येथील स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थानचे संस्थापक पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेस नवी दिल्ली येथील भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी, महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. आषुतोष गुप्ता, विद्यापीठाचे आयुर्वेद विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
’प्रिव्हेंटिव्ह ट्रिटमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ पोस्ट कोविड सिंड्रोम’ या विषयावर स्वामी विवेकानंद अनुसंधान संस्थानचे संस्थापक पद्मश्री डॉ. एच. आर. नागेंद्र यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराचा सामना करत असतांना आयुर्वेद शास्त्रातील योग, प्राणायम आणि ध्यान साधनेचे महत्व अधिक वाढले. रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध महत्वाचा असतो. कोविडच्या संकटातून बाहेर पडलेल्या रुग्णांना योग व प्राणायमाने जगण्याची नवी दिशा मिळाली. समाजात योग-साक्षरता वाढवून उत्तम आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे. आयुर्वेद आणि योगशास्त्रातील नियमांचे पालन केल्यास उत्तम आरोग्य व रोगप्रतिकारशक्ती वाढते. योग हे शास्त्र नसून ते समृध्द जीवन जगण्याचा कला आहे ती सर्वांनी आत्मसात करावी. कोविड-19 आराजानंतर होणारे इतर विविध व्याधी व आजार टाळण्यासाठी योगसाधनेला महत्व द्यावे. पारंपारिक जीवनशैलीचा वापर केल्यास मानसिक स्वास्थ्य लाभते. कोविड-19 संदर्भात आरोग्य विद्यापीठातर्फे ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून जनगागृती करण्याचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांनी सांगितले की, जगभरात कोविड-19 करीता औषधाचे संशोधन सुरु असतांना योग व प्राणायमाने रुग्णांना संजीवनी दिली. कोविड काळात रुग्णांना योगाचे सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळाले. शारीरिक व्याधीसाठी असो वा मानसिक कारणासाठी योग साधना उत्तम आहे. या परिस्थितीत सर्वांनी योगाचा अंगीकार करावा आणि आरोग्य, आनंद आणि समृद्धीचा अनुभव घ्यावा असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष डॉ. आषुतोष गुप्ता यांनी सांगितले की, कोविड-19 नंतर होणाऱ्या आजाराबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे. यासाठी योग साधना महत्वाची आहे. योग व प्राणायमची शास्त्रोक्त पध्दती व माहिती या व्याख्यानमालेच्या माध्यमातून घ्यावी. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. योगाने आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत होते. कोविड-19 आजाराचा सामना करण्यासाठी पारंपारिक जीवनशैलीचा अवलंब करावा असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ आयुर्वेद विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख यांनी सांगितले की, योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग आणि आयुर्वेद एकमेकांस पूरक आहेत. योगशास्त्राचा अवलंब केल्यास मोठया प्रमाणात मानसिक समाधान मिळते. कोविडचा लवकरच नायनाट होईल. याकरीता शासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत दि. 25 जून 2021 रोजी सकाळी 11ः00 वाजता जोधपूर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. अभिमन्यू कुमार हे ’केअर ऑफ चिल्ड्रेन इन कोविड-19 पॅनडेमिक ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन https://youtu.be/tst2JNJJvPE या यु-टयुब लिंकवर तसेच दि. 26 जून 2021 रोजी सकाळी 11ः00 वाजता केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन विभागाचे सदस्य मा. वैद्य विनोद कुमार टी.जी. नायर हे ’आयुर्वेदा इन पोस्ट कोविड सिंड्रोम ’ या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन https://youtu.be/eDrg_0HMWVY या यु-टयुब लिंकवरुन प्रसारित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी ऑनलाईन चर्चासत्राबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे.
सदर ऑनलाईन व्याख्यानमालेत जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन केले तसेच विद्यापीठ आयुष विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यापीठाकडून आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेस मोठया संख्येने शिक्षक, पालक, विद्यार्थी, अभ्यागत व मान्यवर उपस्थित होते.
