नाशिक| कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे मोठा तडाखा बसला आहे. पूरदुर्घटनेत आतापर्यंत १९२ लोकांनी जीव गमावला आहे. त्यात सर्वाधिक जीवितहानी ही रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यात झाली असून, रायगडमध्ये ९५ तर साताऱ्यात ४५ जणांनी जीव गमावला आहे. अद्यापही २५ जण बेपत्ता आहे. आतापर्यंत ३ लाख ७५ हजार लोकांना बचाव पथकाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.
राज्याच्या पूरस्थिती अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, पूरप्रभावित रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई उपनगर या ९ जिल्ह्यात आता पूरपरिस्थिती नियंत्रणात आहे.पूरग्रस्त जिल्ह्यात एनडीआरएफ ३४ आणि लष्कराच्या ३ तुकड्या बचाव कार्यात कार्यरत आहे. दि. २२ ते २६ तारखेपर्यंत या चार दिवसात एनडीआरएफ, लष्कर आणि सरकारी बचाव पथकाने पूरग्रस्त भागातील ३ लाख ७५ हजार १७८ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. महत्वाचं म्हणजे २४ तासात कोल्हापूर येथून १,०९,४८३ लोकांना सुरक्षित हलविण्यात बचाव पथकाला यश आले.
अद्यापही २५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. पुरामुळे १०२८ गावे बाधित झाली आहे, आतापर्यंत पूरदुर्घटनेत १९२ लोकांनी जीव गमावले आहे. त्यात सर्वधिक जीवितहानी रायगड जिल्ह्यात झाली असून येथे ९५ तर साताऱ्यात ४५ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर २८,८०७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. मालमत्ता आणि पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण येथे ५ तात्पुरते निवारा केंद्र स्थापन करण्यात आले. जसा जसा पूर ओसरत आहे तस तसे नुकसानीचे विदारक चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून रोगराई पसरू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे.
