नाशिकरोड| अनेक वर्षांपासून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाची दुरवस्था झाली असून नाशिककरांसाठी ही भूषणावह बाब नाही, तातडीने स्मारकाची दुरवस्था थांबवावी अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने महापौर सतीश कुलकर्णी यांना देऊन त्यांना साकडे घातले.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी नाशिकचे महाकवी वामनदादा कर्डक यांची ९९ वा जयंती उत्सव साजरा केला जातो आहे. नाशिकरोड दसक-पंचक परिसरातील स्मशानभूमीच्या बाजूला असलेले हे स्मारक धूळखात पडले आहे. स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक लोककलावंत बाहेर गावावरून येत असतात. पण स्मारकाला लागलेले ग्रहण पाहून त्यांना निराशाच होते. महाराष्ट्रातील अनेक लोककला आणि कलावंतांना ते आदरस्थानी आहेत. महाराष्ट्र मातीतील लोककला, अस्मिता वामनदादा यांनी जपली आहे. निदान हे जाणून तरी लोककलावंत यांना सन्मान देऊन त्यांच्या स्मारकाची दुरवस्था थांबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, वामनदादा यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा, विद्युतीकरण करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. महापौर कुलकर्णी यांनी तातडीने दुरवस्था थांबविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देऊन तसे आदेश पारित केले.
याप्रसंगी वामनदादा उत्सव समितीचे विनायक पठारे, रत्नदीप जाधव, जयपाल धिवरे, नगरसेवक श्री शरद मोरे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), मोहन जाधव, गुणवंत वाघ, गणेश उन्हवणे, शशिकांत उन्हवणे, हरीश भालेराव, रंगराज ढेंगळे, संजय उन्हवणे, अशोक भालेराव, साराभाई वेळुंजकर, दिपक वाघ, राहुल जाधव, दिपक साळवे, शिवाजी निकम, राज निकाळे, युवराज शिंदे, अनिल लेहणार यांच्या बरोबर साहित्यिक, नवकवी, गायक, वादक, चित्रकार आदी लोककलावंत उपस्थित होते.
