मुंबई| ११ ऑगस्ट १९६६ रोजी एका दिवसाची सामूहिक किरकोळ रजा घेऊन, महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी, राज्यस्तरीय एकजुटतेचे प्रदर्शन दाखवले स्व. र.ग.कर्णिक यांच्या झंझावाती कार्यप्रणालीच्या माध्यमातून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना बलशाली झाली. त्यांच्या कार्याला स्मरून आज चेतना दिन पाळण्यात आला.
आज ११ ऑगस्ट २०२१. गतकाळातील संघटनेच्या अभूतपूर्व यशामुळेच राज्यातील कर्मचाऱ्यांना आर्थिक व सेवा विषयक स्थैर्य लाभले. या संदर्भातील गेल्या ५८ वर्षातील संघटना कार्याच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आजचा चेतना दिन महाराष्ट्रातील सर्व जिल्हानिहाय सरकारी कार्यालयात मोठ्या जोशात साजरा केला गेला. दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत कार्यालय- कार्यालयात कर्मचारी सोशल डिस्टंसिंगचे पालन करून एकत्र आले व राज्य शासनाकडे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी सामूहिक घोषणा देऊन, या प्रातिनिधीक सांघिक कृतीद्वारे शासनाचा लक्षवेध करण्यात आला.
आज राज्यभर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या चेतन दिनाद्वारे दर्शविलेली एकजूट ही सांप्रत राज्य शासनाला नजीकच्या काळात कर्मचाऱ्यांच्या तीव्र असंतोषास सामोरे जावे लागू शकते यासंदर्भातील सूचक कृती आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा योग्य तो बोध घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चेची द्वारे उघडी करावीत, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. सरकार अस्तित्वात आल्यापासून मागण्यांविषयक कोणत्याही स्तरावरील चर्चा एकदाही होऊ नये ही बाब निश्चितच नकारात्मक वाटते.
करोना कालावधीतील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे योगदान, चक्रीवादळ, महापूरासारख्या आपत्ती तील केलेले कर्तव्यकठोर कामकाज यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनातील अगत्याचे स्थान अधोरेखित होते. त्यामुळे त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालून, सत्वर मार्ग काढणे आवश्यक ठरते. अन्यथा नजीकच्या काळात राज्यातील कर्मचारी नाईलाजाने संप आंदोलन छेडतील असा आम्ही पुनरुच्चार करीत आहोत. असे अध्यक्ष अशोक दगडे, सरचिटणीस विश्वास काटकर यांनी सांगितले.


