नाशिकरोड| प्रतिनिधी| हृदयरोग आता तिशीच्या उंबरठ्यावर असतांना देखील होतो. हृदयरोगाला शरीरात साखरेची वाढलेली पातळी कारणीभूत असते. समतोल रक्तपातळी ठेवण्यासाठी योग्य आणि वेळच्यावेळी आहार, व्यायामाची नितांत आवश्यकता गरजेची असून वाढत्या वयात रुग्णांनी यासंदर्भात जास्त काळजी घ्यावी, असे प्रतिपादन प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी केले.
उपनगर येथील युगांतर संपर्क कार्यालयात ईच्छामणी क्लिनिक आणि युगांतर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदयरोग दिनानिमित्त 'आरोग्य तपासणी शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. शिबिरात रक्तातील साखरेची पातळी, रक्तातील चरबीचे प्रमाण, ३ महिन्यातील साखरेच्या पातळीची सरासरी, रक्तदाब यासंदर्भात सखोल तपासणी करून गरजू रुग्ण, वयोवृद्ध, तरुणांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ सौ रेश्मा घोडेराव, डॉ समीर लासुरे यांनी स्वतः रुग्णांची तपासणी करून वाढत्या वयानुसार जीवनशैलीत बदल, नित्य व्यायामाची आवश्यकता, जेवणाच्या योग्य वेळा, व्यसनाचे दुष्परिणाम, हृदयरोग प्रतिबंध कसा करावा याची माहिती सादर केली. १३५ ते १५० रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
याशिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तातील साखर पातळी तपासल्यानंतर ताबडतोब वाढलेल्या साखरेची नोंद केलेले पत्र देण्यात आले. आरएसएस-डीआय (डिफीट डायबेटीस) 'मधुमेह घालवा' याशासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशभरात १ कोटी गरजू रुग्णांची विनामूल्य तपासणी केली जाणार असल्याचे लक्ष्य आहे. त्यानिमित्त जागतिक हृदयरोग दिनाचे औचित्य साधून उपनगर मध्ये सर्व स्तरातील रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे(सर) यांनी आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनाचे महत्त्व कथन करून सर्व उपस्थित डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. चेतन पाटील, प्रशांत वाणी, शैलेश चांद, कुणाल पगारे, कीर्ती सुर्यवंशी यांनी शिबीर यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

