औरंगाबाद|प्रतिनिधी| निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणी जनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. निळे प्रतीकच्या वर्धापन दिनानिमित्त सिडको पोलीस ठाण्याचे कर्तबगार पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु ऐन वेळी काही कारणास्तव अशोक गिरी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. म्हणून त्यांना सिटी चौक पोलिस स्टेशन औरंगाबाद येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष रतन कुमार साळवे, प्रा.बाळासाहेब वानखेडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विविध विषयावर चर्चा करताना पोलिस निरीक्षक अशोक गिरी म्हणाले की, आशिया खंडात औरंगाबाद शहर हे अगदी झपाट्याने वाढणारे शहर म्हणून त्याची नोंद झालेली आहे . उद्योगाची या शहरामध्ये भरभराट आहे.मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था आहेत उद्योगधंदे वाढत असतानाच गुन्हेगारी सुद्धा वाढत चाललेली आहे. सध्याच्या काळामध्ये गुन्हेगारी वाढत असली तरी ही बाब निश्चितच चिंतेची नसून त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे.
प्रत्येकानी आपल्या मुलांवर आई-वडिलांनी लक्ष ठेवायला हवं. योग्य संस्कार करायला हवे .आपला मुलगा काय करतो? कुठे जातो?कोणाशी त्याची मैत्री आहे? रात्री वेळेवर घरी येतो का? अशा बारीक सारीक गोष्टीवर आईवडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुलां मुलींना फ्रीडम मिळायला हवा,परंतु तो किती मिळावा याच्या काही परीसीमा असल्या पाहिजे. प्रचंड वाढती बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, व्यसनधिंनते मुळे तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. आम्ही आमच्या पद्धतीने गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करतच असतो. परंतु आई-वडिलांनीही आपल्या मुलाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. असेही ते म्हणाले.
पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची कामगिरी दमदार असल्यालामुळेच त्यांनी सिडको पोलीस स्टेशनला अडीच वर्ष आपली सेवा बजावली. अनेक गुन्हे उघडकीस आणले. शिवाय अनेकांना गुन्हे करण्यापासून रोखले. कोरोना काळात देखील त्यांची भूमिका महत्वाची अशीच राहिली आहे. सर्व जाती धर्मातील सलोखा, भाईचारा राखण्यास ते यशस्वी राहिले. म्हणून त्यांना निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.