नाशिक| नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेतर्फे शासनाकडे कोरोनाने निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व विमा कवच देण्याची मागणी केली होती. दिवाळी सणापूर्वी ही मदत मिळावी अशी मागणी पुन्हा संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील आणि नाशिक जिल्हाध्यक्ष ह. भ. प. निवृत्ती महाराज कापसे यांनी शासनाकडे स्मरणपत्राद्वारे केली आहे.
शासनाला देण्यात आलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदरांनी धान्याचे वितरण केले, या दरम्यान शेकडो दुकानदार या आजाराच्या कचाट्यात सापडून त्यांना आपला जीव गमवावा लागला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. अशा कुटुंबांना दिवाळी या महत्वाच्या सणाला आर्थिक सहाय्य देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. जेणे करून त्यांची ही दिवाळी सुखाची आणि समाधानाने जाईल.
शासनाने इतर विभागांना घोषित केलेल्या विम्याप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदारांना विमा द्यावा आणि आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ, राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांना स्मरणपत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. मयत सभासदांच्या कुटुंबांचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन दिवाळीपूर्वी आर्थिक सहाय्य द्यावे अशी विनंती संघटनेचे विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज कापसे यांनी केली आहे. यापूर्वी ही संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे असे ही पत्रात नमूद करण्यात आले आहे.