नाशिक| समाज व देशासाठी आपण काय करु शकतो हे चिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व सुशासन दिन निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित कार्यक्रमात केला. याप्रसंगी मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, ओरिजिन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदिप माने आदी मान्यवर उपस्थित होते.
लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. मा. कुलगुरु यांनी सांगितले की, आपण ज्या समाजात राहतो त्यासाठी, आपण ज्या संस्थेत काम करतो त्यासाठी आणि आपल्या देशासाठी आपण काय करु शकतो यांचे चिंतन करण्याचा सुशासन दिन हा दिवस आहे. या निमित्ताने विविध संकल्प करुन समाजाच्या सकारात्मक वाटचालीकरीता प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुशासन दिनाच्या निमित्ताने संकल्प करुया की, नवनवीन गोष्टी आत्मसाद करुन स्वतःमध्ये बदल घडवू. स्वतःला बदलले की समाज बदलेल व देशाची भरभराट होईल. आरोग्य आणि तणाव यांचे संतुलन राखण गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.
ओरिजिन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदिप माने यांनी ’तणाव मुक्ती व्यवस्थापन’ विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, शरीर आणि मन यांचा समनन्वय साधने गरजेचे आहे. तणाव हा शरीरावरही घातक परिणाम करतो. यासाठी नियमित योग व प्राणायम करणे गरजेचे आहे. नियमित संतुलित आहार आणि व्यायाम केल्यास तणाव कमी करता येतो. यासाठी मनाचा निर्धार आणि समाजात जागृती असणे गरजेचे आहे. जीवनशैलीत बदल केल्यास तणावापासून नक्कीच मुक्ती मिळेल. नियमित ध्यान व प्रार्थना केल्यास तणाव कमी होतो. विद्यार्थ्यांनी व सर्वांनी आभासी जगात जगू नका. प्रत्यक्ष जीवनातील सुख-दुःखाचे प्रसंगांचा अनुभव घेऊन निरामय आयुष्य जगावे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व सुशासन दिन निमित्ताने विद्यापीठातर्फे पहिला कार्यक्रम घेण्यात येत आहे. माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वायपेयी यांचे कवी गुणांचा त्यांनी उल्लेख केला. विद्यापीठातर्फे सुशासन दिनाच्या निमित्ताने यापुढे विविध चांगल्या संकल्पना व उपक्रम यांना प्राधान्य देण्यात येईल, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक बदल करणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वायपेयी यांच्या प्रतिमेला मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तणाव मुक्ती व्यवस्थापन विषयावरील व्याख्यानाचे यु-टयुब लिंकवरुन सदर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या ऑनलाईन व्याख्यानास विद्यापीठाचा अधिकारी वर्ग, संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.