- केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते उद्या गांधीनगर 'सीजीएचएस' केंद्राचे उद्घाटन; 'नाशिक' महाराष्ट्रातील चौथे शहर - TheAnchor

Breaking

January 2, 2022

केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते उद्या गांधीनगर 'सीजीएचएस' केंद्राचे उद्घाटन; 'नाशिक' महाराष्ट्रातील चौथे शहर

मुंबई| नाशिक| केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्या सोमवार 3 जानेवारी रोजी सकाळी 11:00 वाजता नाशिक येथील केंद्र सरकार आरोग्य योजनाअंतर्गत नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्राचे (CGHS) उद्घाटन होणार आहे. यानिमित्त आयोजित बैठकीलाही त्या संबोधित करणार आहेत. याप्रसंगी  नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ, नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
केंद्र सरकार आरोग्य योजनेत अधिक शहरांचा समावेश करण्याच्या आणि सीजीएचएस सेवांची सुलभता सुधारण्याच्या प्रयत्न म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 10 जून 2021 रोजी नाशिकमध्ये नवीन अॅलोपॅथिक निरामय स्वास्थ्य केंद्र सुरु करायला मंजुरी दिली आहे. सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र उघडणारे नाशिक हे मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर महाराष्ट्रातील चौथे शहर असेल. नाशिकमधील हे सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र हे गांधीनगर भागात असून सरकारी कार्यालये आणि निवासस्थाने या दोन्हीपासून सोयीच्या अंतरावर  आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारची आरोग्य योजना 1954 मध्ये सुरू करण्यात आली. सीजीएचएस अर्थात केंद्र सरकारची आरोग्य योजना ही भारतातील विधिमंडळ, न्यायपालिका, कार्यकारी मंडळ आणि प्रसार माध्यम या लोकशाहीच्या चारही स्तंभांचा समावेश असलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या आरोग्यसेवाविषयक  गरजा पूर्ण करते. सीजीएचएस हे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तिवेतन धारकांसाठी आदर्श आरोग्य सेवा सुविधा प्रदाता असून त्यांना मोठ्या प्रमाणात लाभार्थी आधार आहे. सध्या संपूर्ण देशातील 74 शहरांमधील अंदाजे 38.5 लाख लाभार्थी केंद्र सरकारी आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.

सरकारी आणि सीजीएचएस योजनेअंतर्गत समाविष्ट केलेल्या निवृत्तीवेतनधारक आणि इतर निवडक लाभार्थ्यांसाठी या योजनेत समाविष्ट केलेल्या केंद्रांमध्ये उपचारांसाठी उपलब्ध रोखरहित सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत शासकीय/खासगी रुग्णालयांमध्ये घेतलेल्या उपचारांच्या खर्चाची परतफेड, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, उपकरणे इत्यादी खरेदीसाठी झालेल्या खर्चाचा परतावा  आणि कुटुंब कल्याण, माता आणि बाल आरोग्य सेवा यासह नाशिकमधील सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्र ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभागाद्वारे  उपचार प्रदान करेल. 

सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचा शहरातील सुमारे 71,000 सेवारत आणि निवृत्तीवेतनधारक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह सुमारे 1.6 लाख लाभार्थ्यांना फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सीजीएचएस निरामय स्वास्थ्य केंद्राचे उपचार घेण्यासाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत होते.