- साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा: नितीन गडकरी - TheAnchor

Breaking

June 4, 2022

साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा: नितीन गडकरी

पुणे| आत्मनिर्भर भारतासाठी भविष्यात पेट्रोल आणि डिझेल सारखे प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्याची गरज असून साखर कारखान्यांनी देखील आगामी काळात साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचं स्पष्ट मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्याजवळील मांजरी इथं व्यक्त केलं.
Sugar-mills-should-focus-on-ethanol-production-Nitin-Gadkari

वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय साखर परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दूरस्थ पद्धतीनं यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह साखर उद्योगातील दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी साखर उद्योगाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं . सध्या 100 टक्के इथेनॉल वर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध असून इथेनॉल हे हरित इंधन मानले जाते. भविष्यात इथेनॉल विक्रीचे पंप सुरू करण्याची गरज असून पुण्यात त्याची अंमलबजावणी व्हावी  अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली . बाजारात सध्या साखरेचे दर वाढलेले दिसत असले तरी ही परिस्थिती कायमस्वरूपी टिकणार नाही म्हणून साखरेचे भाव स्थिर रहण्यासाठी सुद्धा साखरेचं उत्पादन कमी करणे आवश्यक असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केलं.