मुंबई|बाळासाहेब व पवारसाहेब हे दोन्ही मोठ्या मनाचे नेते आहे. बाळासाहेबांनी मला झोपडपट्टीतून पुढे आणत मुंबईचे महापौर केले. तर पवार साहेबांनी समता परिषदेची नेहमी पाठराखण करत माझ्यावर विश्वास ठेवला. अडीच वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पवार साहेबांनी शिवतीर्थावर उभ करुन मंत्रीपद दिले. माझ्या ऐवढा भाग्यवान राजकारणी नेता या देशात दुसरा कोणी नसेल असे सांगत रचनात्मक काम कसे करायचे हे पवारसाहेबांकडून शिकलो असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना छगन भुजबळ बोलत होते.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना छगन भुजबळ म्हणाले की, माझ्या ६१ ची कार्यक्रम हा शिवाजी पार्कच्या मैदानावर पार पडला. त्यात शरदचंद्र पवार साहेब, फारूक अब्दुल्ला हे उपस्थित होते. मात्र आज माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी मंत्री गोपीनाथ मुंडे आपल्यात नाही याची आठवण त्यांनी आवर्जून करून दिली. ते म्हणाले की, ७५ वर्षांचा पट जेव्हा डोळ्यासमोर उभा राहतो. ज्या वयात काही कळत नाही त्या वयात आई वडील यांचे निधन झाले. आईच्या मावशीने मला आणि माझ्या भावाला माझगाव येथे आणलं आणि तिने माझ शिक्षण पूर्ण केले. मुंबईत भाजीपाल्याचा व्यवसाय करत असतांना काही खाजगी कंपन्यांचे भाजी पाल्याचे कंत्राट मिळाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात सामील झालो. शिवसेना पक्षाचा राज्यातील पहिला शाखा प्रमुख बनलो. पुढे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवून नगरसेवक आमदार झालो पुढे राज्याचा उपमुख्यमंत्री, मंत्री अशी अनेक पदे भूषविली. सिनेमा काढले, मुंबई गोवा पहिली लक्झरी बस सेवा सुरु केली. अतिशय कष्टाने आयुष्य उभं केल. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवार साहेबांच्या विरोधात निवडणूक लढविली. यावेळी ज्यांनी मला उभ केल ते जोशी मात्र पवार साहेबांच्या बाजूने गेले अशा अनेक गमतीदार आठवणीना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
ते म्हणाले की, मशाल या चिन्हावर आमदार म्हणून निवडणूक जिंकून आलो तेव्हा आमदार असतांना मुंबईचा महापौर करण्याचे काम स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. या मुंबई शहरात ट्राफिक आयलंड उभं करणे, हुतात्मा स्मारक उभं करणे यासह मुंबईचा विकास करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निणर्य घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्व.दादा कोंडके यांच्या सोबत शिवसेना वाढीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर पुढे शिवसेना पक्षाला धनुष्यबाण निशाणी मिळाली त्यावर पुन्हा आमदार झालो. पुढे मंडलच्या प्रश्नावर ओबीसींच्या प्रश्नावर शिवसेना पक्ष सोडला. पुढे शरद पवार साहेब यांच्या सोबत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना होऊन राष्ट्रवादी पक्षात सहभागी झालो. पुढे समता परिषदेची स्थापना झाली त्यामागे शरदचंद्र पवार साहेब आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यांनी ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं या सर्व प्रसंगाचे वर्णन करतांना त्यांनी अनेक आठवणीना उजाळा दिला.
ते म्हणाले की, सध्या काही वाद संपुष्टाय येत नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग केले जात आहे. पाच हजार वर्ष आम्हाला शूद्र म्हणून शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. अगदी ब्राह्मण मुलींनाही शिक्षणाचा अधिकार नव्हता. महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी खस्ता खाल्या म्हणून इतरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. भिडे व अन्य ब्राह्मणांनी त्यास पाठिंबा दिला. सरस्वतीची पुजा करु नका अस आम्ही म्हणत नाही. दिवसातून दहावेळा पूजा करा. आम्हिपण घरी पूजा करतो. पण शाहू, फुले, आंबेडकर यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. शाळेत या महापुरुषांची पूजा करा. नव्या पीढीपर्यंत हा विचार पोहचला पाहिजे, असे आम्ही म्हणतो याचा पुनरुच्चार त्यांनी केला.