Skip to main content

..आता मराठा समाजाला १० टक्के आणि ओबीसींना हक्काचे २७ टक्के आरक्षण द्या: छगन भुजबळ

नाशिक|मागासवर्गीयांच्याआरक्षणाला असलेली घटनेची ५० टक्क्यांची मर्यादा आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिथिल करता येते तर मग मराठा आरक्षणासाठी ही मर्यादा शिथिल का केली जात नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत का ठेवला जातो आहे असा सवाल उपस्थित करत आर्थिक आरक्षणामुळे आता आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. मग आता मराठा समाजाला १० टक्के आणि आदिवासी बहुल स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी घटकाला त्यांच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
Now-give-10-percent-reservation-to-Maratha-community-and-27-percent-reservation-to-OBCs-Chhagan-Bhujbal
छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक नाशिक येथील राष्ट्रवादी भवन येथे पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी १०% आरक्षणाची तरतूद करणारी १०३ वी घटनादुरुस्ती तीन विरुद्ध दोन मतांनी वैध ठरवली आहे. जाती आधारित आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या एस.सी.-एसटी आणि ओबीसी समाजाला आर्थिक आरक्षणाचा पर्याय खुला न ठेवण्याचा तरतुदीला सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्या.रवींद्र भट या दोन न्यायमूर्तींनी विरोध केला आहे. देशाच्या १४१ कोटी लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व ओबीसींची लोकसंख्या सुमारे ८२ टक्के आहे. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण देतांना आणि या तीनही समाजघटकांमध्ये गरीबीचे प्रमाणही मोठे असतांना केवळ जातीआधारीत आरक्षण मिळते म्हणून आर्थिक निकषांवरील आरक्षणातून त्यांना वगळणे अनुचित असल्याचे मत खुद्द या दोन्ही न्यायमूर्तींनी नोंदवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या वर्गाला आर्थिक आरक्षणातून का वगळावे याबाबत कोणताही तपशिल न्यायालयात सादर करण्यात आलेला नसतांना त्यांना यातून वगळणे हे न्यायोचित नाही. मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हे साधन आहे. मागासवर्गीयांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षणातून वगळल्याने राज्यघटनेतील अनुच्छेद १४ मधील समानतेच्या तत्वाचा भंग होत आहे. त्याचबरोबर राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावणारी ही तरतूद असल्याने दोन्ही न्यायमूर्तींनी या घटनादुरुस्तीला विरोध केला. उच्चवर्णीय वगळता इतर प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी मज्जाव करण्याची भूमिका समान न्यायाच्या मुलभूत संकल्पनेला ठेच लावणारी आहे. सामाजिक मागासच आर्थिक दुर्बलांत बहुसंख्य आहेत. आणि त्यांना मात्र न्यायालयाने मान्यता दिलेल्या केंद्र सरकारच्या आर्थिक आरक्षणातून वगळलेले आहे. म्हणजे शूद्र, अतिशूद्र, आदिवासी, भटके-विमुक्त यांना वगळून केवळ उच्चवर्णीयांना हे आरक्षण मिळणार आहे. यातून पुन्हा जुनी उतरंड कायम व भरभक्कम होण्यालाच चालना मिळणार आहे. या देशातील उच्च नीचतेच्या सामाजिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी संविधानाने केलेल्या उपाययोजनांना यामुळे खीळ बसू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.


ते म्हणाले की, आरक्षणाला सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून पाहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत आरक्षण देताना हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. EWS आरक्षण हे ५० टक्क्यांच्या पुढे जाऊन दिले गेले आहे. त्यामुळे सामाजिक न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाने ही ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकल्यास त्याचा समाजातील अनेक गरजू घटकांना फायदा होईल. *आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्यामुळे अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षण कमी झाले आहे. जर ५० टक्क्यांची मर्यादा उठविली  तर आदिवासी बहुल स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी घटकाला सुद्धा त्यांच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण सगळीकडे मिळेल त्याचप्रमाणे मराठा समाजाचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला आरक्षणाचा प्रश्न सुद्धा सुटेल.* इंद्रा साहनी खटल्यात ९ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेला निर्णय बदलण्याचे काम ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने करणे हा खरे तर घटनात्मक पेचप्रसंग आहे. सरकारला जर देशातील तमाम ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर संसदेद्वारे सुद्धा ते हा प्रश्न सोडवू शकता असे ते म्हणाले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आर्थिक निकषावर आरक्षण हा चटकन पटणारा मुद्दा असतो. पण तो फसवा आहे. खरतर त्यासाठी सरकार विविध योजना आणू शकते. फ्रीशिप, स्कॉलरशिप, वसतिगृह, सुलभ कर्ज योजना आदी सहाय्य त्यांच्यासाठी देता येवू शकते. पण तो आरक्षणाचा आधार होऊ शकत नाही. उच्च जातींचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी आणि एकूण समाजमनात मागास जातींविषयी असलेल्या दुजाभावामुळे त्यांना विकासाच्या हर क्षेत्रात संधी नाकारली जाते. त्यातील फक्त शासकीय नोकरी,शिक्षण व राजकीय प्रतिनिधित्व या तीनच क्षेत्रात कायद्याने काही जागा खास त्यांच्यासाठी राखून ठेवल्या आहेत. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देताना त्यांच्या उत्पन्न निच्छितीसाठीचे धोरण निश्चित होणे देखील गरजेचे आहे. या माध्यमातून खरा लाभार्थी मागे राहणार नाही यासाठी उपाययोजना सरकारने करायला हव्यात अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...