संतोष गिरी
निफाड| तालुक्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज निफाड नगरपंचायतीतर्फे एक मोठी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मास्क न घालणारे त्याचप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन न करणारे अशा नागरिकांवर निफाड नगरपंचायतीच्या वतीने कारवाई करण्यात आली. एकूण 32 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच एक किराणा मालाचे दुकान, एक चप्पल व बूट व्यवसायाचे दुकान या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करता मोठ्या प्रमाणात नागरिक छोट्या दुकानांमध्ये उभे असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदरच्या कारवाईमध्ये निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह नगर अभियंता भालचंद्र क्षिरसागर, लेखापाल नितीन भवर, नगरपंचायतीचे कर्मचारी काकुळते , कुंदे , धारराव, भवर, राजू कापसे , राजू परदेसी, तुषार शिंदे त्याचप्रमाणे हर्षवर्धन मोहिते या सर्वांनी भाग घेतला होता. या सर्व कारवाईमध्ये दंड वसूल करणे हा या मागील हेतू नसून लोकांनी मास्क घालावे, नियम पाळावे, सामाजिक अंतराचे पालन करावे या गोष्टीची सक्ती करणं आणि त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालणं हा एकमेव उद्देश आहे.
तरी निफाड नगरपंचायतीमधील सर्व नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा. त्याचप्रमाणे दुकानांमध्ये विनाकारण गर्दी करू नये. विनाकारण घराबाहेर बाहेर पडू नये. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्यास याबाबत प्रशासनाला माहिती द्यावी असे मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी निफाड शहरातील नागरिकांनासह सर्व शासकीय, निमशासकीय संस्थांना आव्हान केले आहे. काम असेल तरच घराच्या बाहेर पडा "मी सुरक्षित, माझे कुटुंब सुरक्षित" हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन सर्वांनी काळजी घेतली तर या शहरात कोरोनाला अटकाव घालता येईल असे सांगून, कोरोनाला रोखण्यासाठी जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाहेर पडल्याचे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके यांनी सांगितले.