संतोष गिरी
निफाड| तालुक्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुरुवारी निफाड तालुक्यातील नैताळेसह निफाड तालुक्यात ठिकठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर, तसेच गर्दी व नियम न पाळणाऱ्या दुकांनदारावर दंडात्मक कडक कारवाईची संयुक्त मोहीम प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आली.
या मोहिमेत निफाडच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ अर्चना पठारे, तहसिलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदीप कराड, पोलिस निरीक्षक रंगराव सानप, पोलीस उपनिरीक्षक ए. एन.कोठळे, विस्तार अधिकारी के.टी. गादड, तलाठी एन.आर.केदार, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, खैरनार, राजेंद्र दहिफळे ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.
नैताळे येथील कारवाईत विना मास्क फिरणाऱ्या २ नागरिक व एका दुकानांवर ५४००/- रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली, तसेच गृह विलगीकरण केलेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आणि घ्यावयाच्या काळजी बाबत माहिती दिली. या मोहिमे दरम्यान महसूल, पोलीस व ग्राम प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजनाची माहिती देण्यात आली, तसेच नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.