- ब्रिटन- भारत दरम्यानची सर्व विमान उड्डाणे ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित - TheAnchor

Breaking

December 21, 2020

ब्रिटन- भारत दरम्यानची सर्व विमान उड्डाणे ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित

नवी दिल्ली| ब्रिटनहून भारतात येणारी सर्व विमान उड्डाणे 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री हरदीप सिंह  पुरी यांनी दिली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीचा काही देशात फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

All-UK-India-flights-temporarily-suspended-covid-
फोटो:फाईल

ब्रिटनमध्ये कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने ब्रिटनहून येणारी आणि जाणारी सर्व विमानउड्डाणे 31 डिसेंबर पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती 22 डिसेंबर 2020 च्या रात्री 11.59 वाजल्यापासून सुरु होईल. मात्र डीजीसीए ने मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय ऑल कार्गो ऑपरेशन आणि उड्डाणासाठीसाठी हा प्रतिबंध राहणार नाही. 


इतर देशातून भारतासाठी विमान उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्या, ब्रिटनहून भारतात येणाऱ्या कोणत्याही प्रवाश्याला विमानात प्रवेश देणार नाहीत आणि ब्रिटनहून  आलेला आणि भारतातल्या कोणत्याही ठिकाणासाठीचा प्रवासी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विमानात नाही याची खातरजमा करतील.  


खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणाऱ्या  (उड्डाण केलेली विमाने, किंवा 22 डिसेंबर 2020 च्या रात्री 11.59 वाजण्यापुर्वी येणारी विमाने) सर्व विमानातल्या  प्र्वाश्यांसाठी भारतात आल्यानंतर आरटी- पीसीआर चाचणी अनिवार्य आहे. प्रवासी कोविड पॉझीटीव्ह असल्यास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्याला  विलगीकरणात राहावे लागेल आणि त्याचा वैद्यकीय खर्च त्याला उचलावा लागेल.