Skip to main content

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स!

धैर्यवान, विक्रमवीर सुनीता विल्यम्स 

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने अंतराळात राहिल्यावर पृथ्वीवर परतले. १७ तासांचा परतीचा प्रवास हा नासा आणि स्पेसएक्ससाठी जितका आव्हानात्मक होता, इतकाच तो क्रू -९ अंतराळवीरांची परीक्षा बघणारा ठरला. ८ दिवसासाठी अंतराळात गेलेले विल्यम्स आणि विल्मोर स्टारलाईंनर यानातील निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ९ महिने अंतराळात अडकून राहिले. अखेर स्पेसएक्स आणि नासाच्या एकत्रित प्रयत्नाने विल्यम्स आणि विल्मोर यांना बुधवारी पृथ्वीवर सुरक्षित आणले आणि नासासह संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास सोडला.

नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे चौघे पृथ्वीवर सुरक्षित पोहचले. स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाच्या मदतीने बुधवारी  दि. १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३: ३० वाजता फ्लोरिडातील टलाहासीच्या किनाऱ्याजवळील पाण्यात यान यशस्वीपणे उतरले. या बहुप्रतिक्षित, यशस्वी पुनरागमनाची वाट नासा आणि जगभरातील लोक उत्सुकतेने पाहत होते. १७ तासांच्या प्रवासानंतर ते पृथ्वीवर दाखल झाले. प्रवास वाटतो इतका सोपा नव्हता. तेवढाच आव्हानात्मक, धोकादायक होता. नासाने सूक्ष्म नियोजन केल्याने अंतराळवीर सुरक्षित पृथ्वीवर उतरले. क्रू-९ चे सदस्य विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्याचे अमेरिकन राष्ट्रपतींनी देशाला दिलेले आश्वासन ही पूर्ण केले.


विल्मोर आणि विल्यम्स गेल्या वर्षी ५ जून २०२४ ला बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानमध्ये बसून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. हे दोघे अंतराळवीर आयएसएसवर (ISS) पोहचल्यानंतर त्यांना सुमारे एक आठवडा तिथे राहायचे होते. मात्र बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानात आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पृथ्वीवर परत आणणे जोखमीचे झाले होते. म्हणून त्यांना आयएसएसवर नऊ महिन्यांचे प्रदीर्घ वास्तव्य करावे लागले. अखेर १६ मार्चला क्रू- १० स्पेस स्टेशनवर डॉक झाल्यावर विल्यम्स व विल्मोरे यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यांचे स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान बुधवारी यशस्वीरित्या अनडॉक झाले, १७ तासांचा आव्हानात्मक प्रवास करून अंतराळवीरांचा क्रू निक हेग आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळयानासह पृथ्वीवर परत आले. पृथ्वीवर येतांना ड्रॅगन यानाचा वेग नियंत्रित करणे आणि पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर प्रखर उष्णतेचा सामना करणे ही दोन प्रमुख आव्हाने 'नासा'समोर होती. ड्रॅगन यानातील उच्च गुणवत्तेचे हिटशिल्ड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे या आव्हानावर मात करणे शक्य झाले. अपवाद ७ मिनिटांचा ब्लॅकआऊट होता, परंतु त्यानंतर जमिनीवरील कंट्रोल स्टेशन आणि ड्रॅगन यान यांचा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. पुढीलप्रवास नियोजनानुसार झाला. अंतराळ मोहिमा अनेक वेळा अयशस्वी ही झाल्या आहेत,  २००३ साली कोलंबिया अंतराळ शटलचा अपघात झाला होता. अमेरिकेचे अंतराळ शटल कोलंबिया प्रक्षेपणानंतर १६ दिवसांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना कोसळले, त्यात सर्व ७ अंतराळवीरांचा मृत्यू झाला. त्यात भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांना ही प्राण गमावावे लागले होते. या अपयशांनंतरही, अंतराळ मोहिमांमध्ये अनेक यश मिळाले आहेत आणि मानवतेने अंतराळ संशोधनात मोठी प्रगती केली आहे.


क्रू-९ मोहिमेने केलेले विक्रम

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने स्पेसएक्स क्रू-९ मोहिमेबद्दल काही आकडेवारी शेअर केली आहे. सुनीता विल्यम्स यांनी अमेरिकन अंतराळवीर म्हणून अंतराळात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वेळ घालवला  सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या तीन उड्डाणांमध्ये ६०८ दिवस अंतराळात घालवले, बुच विल्मोर यांनी ४६४ दिवस अवकाशात घालवले. विल्मोर आणि विल्यम्स यांचा २८६ दिवसांचा मुक्काम सामान्य सहा महिन्यांच्या आयएसएस रोटेशनपेक्षा जास्त असला तरी, एकल-मिशन कालावधीसाठी अमेरिकेच्या रेकॉर्डमध्ये ते फक्त सहाव्या क्रमांकावर आहे.  विल्यम्स आणि विल्मोर यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान १२१,३४७,४९१ मैलांचा प्रवास केला, २८६ दिवस अंतराळात घालवले आणि पृथ्वीभोवती ४,५७६ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दरम्यान, हेग आणि गोर्बुनोव्ह यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान ७२,५५३,९२० मैलांचा प्रवास केला, १७१ दिवस अंतराळात घालवले आणि पृथ्वीभोवती २,७३६ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. विल्यम्सने महिला अंतराळवीर म्हणून एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर अंतराळात फिरण्याचा विक्रम केला आहे आणि अवकाशात चालणाऱ्या अवकाशयानांच्या यादीत हा चौथा क्रमांकाचा आहे. सुनीता सार्वाधिक ६०८ दिवस अंतराळात राहणारी नासाची दुसरी अंतराळवीर ठरली आहे. याआधी पेगी व्हिटसन हिनेे चार मोहिमांमध्ये ६७५ दिवसांचा अमेरिकन विक्रम नोंदविला आहे.


विल्यम्स आणि विल्मोर यांची कामगिरी

आपल्या मोहिमेदरम्यान सुनीताने विज्ञान आणि देखभाल उपक्रम आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांमध्ये योगदान दिले.  तिच्या संशोधनात वनस्पतींची वाढ आणि गुणवत्ता तसेच रक्त रोग, स्वयंप्रतिकार विकार आणि कर्करोगाच्या उपचारांमध्ये स्टेम सेल तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा समावेश होता. तसेच स्पेस स्टेशनची रेडिओ फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना असेंब्ली काढून टाकणे, विश्लेषणासाठी स्टेशनच्या बाह्य पृष्ठभागावरून नमुने गोळा करणे, एक्स-रे टेलिस्कोपवरील लाईट फिल्टरच्या खराब झालेल्या भागांना झाकण्यासाठी पॅचेस लावणे आदी कामे केली. अमेरिकन क्रू सदस्यांनी ९०० तासांहून अधिक संशोधनासह १५० हून अधिक अद्वितीय वैज्ञानिक प्रयोग आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके या मोहिमेत केली. 


सुनीता विल्यम्सच्या अंतराळ मोहिमा

२००६ मध्ये स्पेस शटल डिस्कव्हरीमधून उड्डाण केले. २००६ ते २००७ पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) १९५ दिवस मुक्काम होता. २०१२ च्या मोहिमेत आयएसएसवर (ISS) १२७ दिवस घालवले. महिला अंतराळवीरांनी सर्वाधिक स्पेसवॉक (चार) करण्याचा विक्रम तिच्याकडे आहे. महिला अंतराळवीरांनी सर्वाधिक स्पेसवॉक (२९ तास आणि १७ मिनिटे) करण्याचा विक्रम ही तिच्या नावावर आहे. तसेच २०२४-२५ च्या क्रू-९ मोहिमेत विल्यम्सने महिला अंतराळवीर म्हणून एकूण ६२ तास ६ मिनिटे अंतराळ स्थानकाबाहेर अंतराळात फिरण्याचा विक्रम केला आहे. तिने केलेल्या अतुलनीय कामगिरीचा नासाने विशिष्ट सेवा पदक, नासा अपवादात्मक सेवा पदक, अंतराळ संशोधनासाठी रशियन मेडल ऑफ मेरिट असे पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अंतराळवीरांना कठोर प्रशिक्षण दिलेले असते, असे असले तरी स्पेसमध्ये अनेक आव्हाने येत असतात. त्यांना रेडियशनचा धोका अधिक असतो, आरोग्याच्या समस्यांना सामोरे जात असतांना आपले मानवी संशोधनाचे कर्तव्य यशस्वी पार पाडले. वैद्यकिय उपचारानंतर अंतराळवीर सुनीताला कुटुंबाला भेटण्याची मुभा दिली जाईल. म्हणून सुनीता विल्यम्स ही अनेकांसाठी प्रेरणा आहे, तिने असाधारण धैर्य, दृढनिश्चय आणि अंतराळ संशोधनासाठी समर्पण दाखवले याचा नासासह भारताला ही अभिमान आहे.


दिगंबर मराठे




 

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...