पवार साहेबांनी महाराष्ट्राला वैचारिक दृष्ट्या ८०० वर्ष पुढे नेले
नाशिक| शरद पवार साहेब हे सतत आस्तित्वासाठी झगडणा-या बहुजनांच्या पेशींमध्ये आत्मसन्मानाचं बीज पेरत आले. तुकोबा, ज्ञानोबा, चोखोबा, नामदेव, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई, राजर्षि शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण हा सर्वसमावेशक पुरोगामी विचारांचा तेजस्वी वारसा काळजात आरपार त्यांनी भरून घेतला आहे. सहा दशकांपूर्वी या दगडांच्या देशातून स्वत:ची त्यांनी पायवाट निर्माण करीत, निर्धाराचं पाऊल टाकत, चालायला प्रारंभ केला. याच परंपरेचे खासदार शरदचंद्र पवार साहेब हे तेजस्वी पाईक आहेत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे नाशिक येथील जयशंकर फेस्टिव्हल बँक्वेट हॉल येथून उपस्थित होते. याठिकणाहून त्यांनी खा.शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहेर, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूणे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राजेंद्र जाधव , दिलीप खैरे, नानासाहेब महाले, बाळासाहेब कर्डक, सचिन पिंगळे, अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगले, गजानन शेलार, समिना मेमन, जगदीश पवार,रत्नाकर चुंभळे, विजय पवार, शरद गायधनी, नाना सोनावणे, सलीम शेख, डॉ.शेफाली भुजबळ, कविता कर्डक, किशोरी खैरनार, रामू जाधव, पद्माकर पाटील, चंद्रकांत साडे, हरीश भंडागे, दत्ता काका पाटील, असिफ जानोरीकर, शरीफ बाबा, किशोर शिरसाठ, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, जीवन रायते, मकरंद सोमवंशी, कुणाल बोरसे, मुख्तार शेख, चिन्मय गाढे, गौरव गोवर्धने, समाधान जेजुरकर, बाळासाहेब गीते, सुरेखा निमसेयोगेश निसाळ, संदीप गांगुर्डे, गौरव वाघ, सतीश आमले, नाना पवार, विलास सानप, सोमनाथ खातळे, योगेश दिवे, मनोहर बोराडे, राजेंद्र शेळके, संजय वझरे, धीरज बच्छाव, भालचंद्र भुजबळ, उदय सराफ, प्रसाद सोनवणे यांच्यासह व्हर्च्युअल रॅलीत नांदगाव विधानसभा मतदारसंघातुन माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांचे विचार पुन्हा नव्याने महाराष्ट्राच्या दगडमातीत रूजू लागले आहेत. कणखर विचारांचे भाले गवतांना पुन्हा दणक्यात फुटू लागले आहेत. त्यांचा आज वाढदिवस आपण साजरा करत आहोत. पण वाढदिवस माणसांना असतो युगाला नसतो असे सांगत ते असतं अजरामर, मूल्यविचारांसारखं चिरंजीव महाराष्ट्राचं हे युग - हे पर्व आज ८० वर्षांचं होत असलं, तरी महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या ८०० वर्ष पुढे घेऊन गेलेलं हे महायुग आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ते म्हणाले की, राज्यातील गोर गरिबांनी मंडल आयोग मागितला तो पवार साहेबांनी दिला. त्याच सोबत महिला आरक्षणाचा गौरवशाली निर्णय, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असे अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रात ८० टक्के उद्योग पवार साहेबांनी आणले. त्यांना कुटुंबाकडून पुरोगामी वारसा मिळाल्याने पवार साहेब सर्वसामावेश विचार करणारे नेतृत्व बनले. त्यामुळे फिनिक्स पक्षाला दुसरं नाव द्यायचं असेल तर शरद पवार यांच नाव दिलं पाहिजे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संकटे आली त्यावेळी त्यांनी पुन्हा फिनिक्स पक्षा प्रमाणे झेप घेतली असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारची मोट पवार साहेबांनी बांधली. त्याचप्रमाणे देशात सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महाविकास आघाडी तयार करण्यासाठी ते प्रयत्न करतील असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
रक्तदान शिबिराचे उदघाटन
खा. शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कार्यक्रम स्थळी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.