- विचारनिष्ठ आणि सरकारात्मक कार्यनिपूण नेतृत्व: ना. छगन भुजबळ - TheAnchor

Breaking

December 12, 2020

विचारनिष्ठ आणि सरकारात्मक कार्यनिपूण नेतृत्व: ना. छगन भुजबळ

गेली काही दशक ज्या नावाभोवती केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाच राजकारण फिरत आले आहे. ते नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला हे नाव परिचित आहेच देशातही त्यांच्या नावाची वेगळी छाप आहे. शरद पवार या नावाच ‘गारुडच’  देशभरात आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. शरद पवार साहेब म्हणजे खऱ्या अर्थाने विचारशीलांचं, विचारनिष्ठांचं आणि सकारात्मक कार्यनिपुणता असलेल नेतृत्व आहे. आज शरद पवार साहेब हे आपल्या संघर्षमय जीवनाची ८० वर्ष पूर्ण करत आहेत, त्याबद्दल मी सुरवातीलाच त्यांना शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करतो... 
फोटो:फाईल

साधारण १९५६ सालापासून शरद पवार साहेबांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. काँग्रेसचे सर्वात तरूण अध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांनी पटकवला त्यावेळी त्यांचे वय होते अवघे २४ वर्ष. पुढे जाऊन १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न हाताळायला सूरवात केली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव गाजायला लागले, ते १९७८ च्या मध्यापासून. पुलोदचा प्रयोग करत त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापले आणि देशातले ते सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. १९९१ साली मी खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत काम करण्यास सुरवात केली. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात हा मुद्दा घेऊन १९९१ साली मी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तेंव्हापासून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. पुढे काँग्रेस पक्षापासुन फारकत घेत पवार साहेबांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्यावेळी आम्ही अनेक सहकाऱ्यांनी एका पाउलावर पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
 
फोटो:फाईल

श्री.यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्याने राज्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा पाया घातला. राज्याच्या विकासाचा एक रोडमॅप त्यांनी आखून दिला. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांनी त्या रोडमॅपचा पुढे विस्तार केला आणि महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा अधिक बळकट केली. याच परंपरेचे एक महान पाईक असलेल्या श्री. शरद पवार यांना स्व. यशवंतराव चव्हाण यांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेला होता. त्यांच्याच आशीर्वादाने पवार साहेबांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी राजकारण आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीच्या उत्थानाची सुरवात केली. समाजमनाची नेमकी जाण असलेल्या या नेत्याने शेतकरी, कष्टकरी,दलित, शेतमजूर, दुर्बल, मागासवर्गीय, उपेक्षित अशा वंचितांच्या उत्थानासाठी स्वतःला वाहून घेतले.
फोटो:फाईल

दि.१ नोव्हेंबर १९९२ साली मी सामाजीक कार्यासाठी समता परिषदेची स्थापना केली. १९९३ मध्ये समता परिषदेचा पहिला मेळावा आयोजीत केला. जालना येथे झालेल्या या मेळाव्यात अध्यक्षपदी स्वत: पवार साहेब होते. तत्कालीन समाजकल्याण मंत्री सिताराम केसरी, रामदास आठवले, शिवाजीराव शेंडगे, मधुकर पिचड या मान्यवरांसह सुमारे २ लाखांहून अधिक समता सदस्य आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. याच मेळाव्यात आम्ही मंडल आयोग लागू करण्यात यावा असा ठराव करून मा.श्री.शरद पवार यांच्या कडे लागू करण्यासाठी मागणी केली. त्यानंतर तातडीने त्यांनी १९९४ साली मंडल आयोग लागू केला आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या तमाम मागासवर्गीय  बांधवांना झाला. मंडल आयोगाची मागणी यशस्वी झाल्यानंतर त्याचा आनंद सोहळा देखील आम्ही १९९४ साली अमरावती मध्ये घेतला होता. याच मेळाव्यात मंडल आयोग लागू केल्याबद्दल मा.श्री.शरद पवार यांचे आम्ही महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीने आभार मानले यावेळी तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री मुकुल वासनिक देखील उपस्थित होते...
फोटो:फाईल

शरद पवार साहेबांना देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, विज्ञान, कला,  क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्राविषयी सखोल जाण आहे. भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिकस्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पवारांनी पोहचविले.
फोटो:फाईल

प्रशासकीय कामकाजात हातखंडा असलेल्या पवार साहेबांनी सामाजिक क्षेत्रासाठी सुद्धा मोठ काम केले आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने प्रभावीपणे केली होती. त्यासाठी मोठा लढा उभारावा लागला यात पवार साहेबांनी पुढाकार घेतला आणि जुलै १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. मराठावाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या काळात मराठवाड्यात दंगली पेटल्या होत्या,त्या शांत करुन लोकांमध्ये जातीय सलोखा घडवणे अतिशय गरजेचे होते शरद पवार यांनी त्यातही मोलाची कामगीरी करून दंगली थांबवल्या त्यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या सदस्यांनी सुद्धा मराठवाड्यातील गावांगावात जाऊन जातीय सालाखो निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले होते. ओबीसी समाजाच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहे.

फोटो:फाईल


राज्याचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, त्याचबरोबर निर्णय प्रक्रियेत खऱ्याखुऱ्या लाभार्थींना सामील करून घेतले पाहिजे, हा स्व. यशवंतराव चव्हाण यांचा विचार समोर ठेवून पवार साहेबांनी या सत्तेच्या विकेंद्रीकरणाला अधिक व्यापक स्वरुप दिले. निर्णयप्रक्रियेत महिला तसेच मागासवर्गीयांना सामावून घेण्यासाठी या दोन्ही वर्गांसाठी आरक्षण लागू केले. त्यामुळे आज सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये या दोन्ही वर्गांना आपल्या आशा-आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हक्काचे स्थान मिळाले आहे. मला आठवत की आम्ही नागपुरला समता परिषदेचा मेळावा घेतला होता त्या मेळाव्यात मा.श्री.शरद पवार यांनी राज्यपातळीबरोबरच आता ओबीसींचे संघटन करण्यासाठी देशपातळीवर मेळावे घ्यावे अशी सुचना वजा आदेशच दिले. त्यानंतर लगेचच २००५ मध्ये रामलीला मैदान दिल्ली येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात केंद्रीय शिक्षण संस्थामध्ये, नोकऱ्यांमध्ये ओबीसींना राखीव जागा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या मेळाव्यास मा.श्री.शरद पवार, मा.श्री.लालू प्रसाद यादव, मा.श्री. शरद यादव, यांच्यासह देशभरातील प्रमुख मान्यवर तसेच ५ लाखांहून अधिक समता सदस्य उपस्थित होते. यानंतर बिहार, राजस्थान, झारखंड, मध्यप्रदेश येथे देखील मेळावे घेण्यात आले होते.

गेल्या १४ वर्षापासून उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना समता पुरस्काराने गौरवीत येत आहे. त्यात मा.श्री. वीरप्पा मोईली, श्रीमती अरुंधती रॉय, मा.श्री. कुमार केतकर, मा.श्री. शरद यवाद, मा.श्री. भालचंद्र नेमाडे, मा.श्री.हरी नरके, मा.श्री.उत्तम कांबळे, मा.श्री. भालचंद्र मुणगेकर याच्यासह समाजातील विविध मान्यवरांना गौरविण्यात आले होते. सन २०१८ सालचा समता पुरस्कार हा मा.श्री.शरद पवार यांना आम्ही देण्याचे ठरवले आणि अतिशय सन्मानाने तो त्यांनी स्विकारला.

संकटांच्या काळात खचून न जाता विपरीत परिस्थितीवर विजय कसा मिळवायचा, पुन्हा विकासाच्या दिशेने झेप कशी घ्यायची याचा आदर्श महाराष्ट्रातील जनते समोर मागच्या वर्षीच शरद पवार यांनी उभा केला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने २०१४ पासून असलेल्या सत्तेचा गैरवापर केला. या सत्तेचा वापर करून भाजपने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पूर्णतः नामोहरम करण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद यातील सर्व तंत्राचा वापर केला गेला. पण महाराष्ट्राच्या जनतेने कौल काही वेगळाच दिला. मोठा पक्ष असुन सुद्धा भाजपाला सत्ता स्थापन करता आली नाही. शरद पवार यांच्या असाधारण योगदानातूनच महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.

आज वयाच्या ८० व्या वर्षी तरुणालाही लाजवेल, अशा उत्साहाने पवार साहेब रात्रंदिवस काम करत असलेले दिसतात. शरद पवार साहेब म्हणजे राजकारण,समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभच आहेत. फुले-शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा उदात्त आणि थोर सामाजिक दृष्टीकोन असणारा मुत्सद्दी नेता लाभला, ही बाब अभिमानास्पद आहे. त्यांना दीर्घार्युरारोग्य लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

लेखक
मा. ना. छगन भुजबळ 
अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा 
पालकमंत्री नाशिक जिल्हा.