- सार्वजनिक जीवनात काम करतांना समाजातील शेवटच्या माणसाचे हित जपा: खा. शरद पवार - TheAnchor

Breaking

December 12, 2020

सार्वजनिक जीवनात काम करतांना समाजातील शेवटच्या माणसाचे हित जपा: खा. शरद पवार

मुंबई| सार्वजनिक जीवनात काम करत असताना समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताचीही जपणूक करण्याचे काम मी मागील ५०-५५ वर्षे करतोय. हे काम करण्याची संधी मला महाराष्ट्राच्या जनतेने दिली. माझ्या कुटुंबाची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची साथ त्याला लाभली, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.   
When-working-in-public-life-look-after-the-interests-of-the-last-person-in-the-society-Sharad-Pawar
खा. पवार म्हणाले, आज माझ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डिजिटल रॅली व इतर माध्यमांतून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने माझ्यावर त्यांच्या निस्सीम प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला त्याने मी भारावून गेलो आहे. 

सार्वजनिक जीवनात काम करत असताना समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताचीही जपणूक करण्याचे काम मी मागील ५०-५५ वर्षे करतोय. हे काम करण्याची संधी मला महाराष्ट्राच्या जनतेने दिली. माझ्या कुटुंबाची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची साथ त्याला लाभली, याबाबत कृतज्ञतेची भावना माझ्या मनात आहे. 

ज्यांच्यापासून आपण शिकलो, त्या शिकवणुकीचे स्मरण आजच्या दिवशी करणे गरजेचे आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे स्मरण आजच्या दिवशी करणे अनिवार्य आहे. पण या महापुरुषांचा फक्त उल्लेख करून चालणार नाही, तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला नेहमीच चालायचे आहे.  

स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचे सूत्र माझ्या आईने स्वीकारले होते. ते काम करत असताना कौटुंबिक जबाबदारीसुद्धा कटाक्षाने पाळली पाहिजे, ही भूमिका देखील त्यांनी आयुष्यभर निभावली. त्यांच्याकडून आम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन लाभला, हे मी माझे भाग्य समजतो. 

कोरोनाचा काळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचे मी टाळत होतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच ठिकाणी डिजिटल माध्यमातून राज्यातील सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली,  त्यामुळे मला नाही म्हणता आले नाही. 

आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनात मला पक्षातील तरुण पिढी पुढे दिसली. त्यांची ऊर्जा आणि उत्साह दिसला. सार्वजनिक आणि समाजकार्यासाठी नवी पिढी तयार होणे, ही राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगली बाब आहे, असे पवार म्हणाले.