अनाथांच्या डोक्यावर छत्र उभा करणाऱ्या सिंधुताई सातत्याने महाराष्ट्रभर फिरून आपल्या पिलांसाठी निधी जमवायच्या. सांगली जिल्ह्याचे त्यांचे येणे जाणे अनेकदा व्हायचे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक घरे त्यांनी जोडली. 94-95 साल असावं... ताई आमच्या घरी आल्या होत्या. पाहुण्यांचे आगत-स्वागत हा तर आमच्या मातोश्रींचा आवडता छंद.
महाराष्ट्रातील खूप मोठ्या, भल्या माणसांनी तिने बनवलेल्या उत्तम भोजनाचा आस्वाद घेतला आहे. त्यात सिंधुताईंचाही समावेश होता. पप्पानी त्यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे त्या दिवसभर आमच्या घरीच होत्या. आम्हा सर्व मुलांशी, आई, आजी बरोबर गप्पा झाल्या. अनेक लोकांनी आमच्या घरी येऊन त्यांना मदत देऊ केली. ताईना पुढे जायचे होते, जाताना निरोप घेता घेता आजीने पुन्हा येण्यास सांगितले.
.... तशा त्या म्हणाल्या, हे घर पण आता माझे माहेर झाले. आप्पासाहेब काटकर नावाचा मला एक भाऊ मिळाला...कधीही येईन..... सोबतचा फोटो पप्पा आणि सिंधुताई यांचा असा सहजफोटो निघण्याचे कारण म्हणजे, छायाचित्रकार नाना धामणीकर यांना ताईंचे फोटो घ्यायचे होते. त्यासाठी ते आले होते. ताई बोलत होत्या, पुढे बसलेलो लोक ऐकत होते. त्यांचे बोलणे ऐकून वयोवृद्ध नाना भारावले आणि त्यानी अक्षरश: पायावर डोकं ठेऊन ताईंना नमस्कार केला.
पुढे सांगलीत कार्यक्रमासाठी ताई आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. तेव्हा त्या कुटुंबातील सर्वांशी फोनवर बोलल्या. डॉ.पतंगराव कदम यांच्या वाढदिवसाच्या अंकासाठी मुलाखत घेण्यासाठी त्यांच्याशी फोनवरुनच एकदा खूप बोलणे झाले. मी अनाथांची आई म्हणून फिरते. पण पतंगराव कदम यांनी माझ्या मुलीचे पालकत्व स्वीकारले म्हणून तिचे उच्च शिक्षण झाले... अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. कृतज्ञपणे आणि काळजाला भिडणारे बोलणाऱ्या, माणसं जोडणार्या ताई आज नाहीत असे म्हणतानाही डोळे भरून येतात.
शिवराज काटकर,
वरिष्ठ पत्रकार, सांगली