- विभागीय आयुक्तालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; पदक प्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव - TheAnchor

Breaking

August 15, 2020

विभागीय आयुक्तालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; पदक प्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

नाशिक| कोरोनाच्या संकट काळात शासन, प्रशासन आणि नागरिकांचा पुढाकार कौतुकास पात्र आहे. त्यामुळेच कोरोनाचा संकट काळ हा आपणा सर्वांसाठी स्वावलंबी व सशक्त बनण्याची संधी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले. 
Flag-hoisting-by-the-Guardian-Minister-at-the-Divisional-Commissioners-Office-Medal-winning-police-officers-staff-honors

भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे उपस्थित होते.आज सर्व भारतीयांच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यातुन आपला महाराष्ट्र, आपला जिल्हाही या आपत्तीच्या सावटाखाली आहे. संकट भले कितीही मोठे असो आपण सर्वजण जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरून त्याचा एक दिलाने सामना करु. तसेच देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग आपल्या क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी बांधला होता तसाच संकल्प आज देशाला, राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी करुया असे आवाहन, राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

 जनतेला संबोधित करत असतांना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना तितक्याच झपाट्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही लक्षणीय आणि आशादायी आहे. त्यात आपल्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांचे अहोरात्र परिश्रम आहेत. त्यातील अनेकांना कर्तव्यावर असताना कोरोनाची बाधा झाली. त्यात पोलीस यंत्रणा व आरोग्यकर्मी अत्यंत जोखीमेच्या शीर्षस्थानी आहेत. कोरोनाशी लढतांना जीव गमवलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना दु:ख पचवण्याची व पुन्हा नव्याने आयुष्याची सुरूवात करण्याची क्षमता, बळ मिळो, असेही  पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले. 

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर बनले लोकचळवळ 

जिल्ह्यात कोरोना संकटाची परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण व जिल्हा प्रशासना मार्फत इमर्जंन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली होती. गेल्या पाच महिन्यात या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने केवळ सर्व प्रशासकीय यंत्रणेलाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजसेवक, उद्योग, धार्मिक संस्था यांना एका सांध्यात जोडून आपत्ती निवारणाच्या कामाला लोकाभिमुख चेहरा प्राप्त करून दिला आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून शासकीय व प्रशासकीय मदतीचा प्रवाह एक लोक चळवळ बनला असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

उपचाराबरोबरच इतर आवश्यक बाबींची शाश्वत साखळी निर्माण करण्यात यश
उपचाराबरोबरच निरनिराळ्या पातळीवरील आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, अन्नधान्य वाटप, कृषी व त्यासंबंधीत जीवनावश्यक बाबी, उद्योग, औषध पुरवठा, कोरोना चेक पोस्ट, उद्योग परवाने आणि अन्नदानाची एक शाश्वत साखळी निर्माण करण्यात यश प्राप्त झाले आहे. या सर्व प्रक्रीयेत जनतेचा आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळेच संकट काळात गरजू व स्थलांतरीत लोकांसाठी 159 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 17 लाख 53 हजार 545 अन्न पाकीटांचे वाटप करून अन्नदान करू शकलो. त्याचप्रमाणे या कालावधीत 98 हजार 827 अन्न धान्याचे कीट व जीवनावश्यक वस्तू, 91 हजार 676 किलो धान्य, तसेच 1 लाख 13 हजार 524 मास्कचे वाटप करून शासन व प्रशासनाच्या कोरोना नियंत्रणाच्या कामाला हातभार लावला असल्याचे , पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले.

पुरवठा विभागामुळे टळली उपासमार  

या संकट काळात  कोणीचीही उपासमार होऊ नये यासाठी पुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय योजनेंतर्गत 76 हजार 519 मे. टन गहू व तांदुळाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 71 हजार 512 मे. टन गहू व 6 हजार 531 मे. टन तांदुळाचे वाटपाबरोबरच केशरी शिधापत्रिका धारकांना 7 हजार 467 मे. टन गहू व 4 हजार 826 मे. टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. आत्मनिर्भर विनाशिधापत्रिका धारक योजनेंतर्गत मे व जून 2020 या कालावधीत 1 हजार 934 मे. टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. कुणाचीही उपासमार होणार नाही या एका ध्यास आणि संकल्पाने राज्याचा अन्न, नागरी पुरवठा विभाग काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून शिवभोजन योजनेचा 26 जानेवारी 2020 प्रारंभ करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात 44 शिवभोजन केंद्रामार्फत आतापर्यंत 6 लाख 58 हजार 941 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले.

कोरोना संकटात संपूर्ण शेती अनलॉक 

कोरोना संकटात संपूर्ण जग लॉकडाऊन असताना शेती मात्र अनलॉक होती. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी आणि शेती अडचणीत येणार नाही यासाठी शासन वचनबद्ध आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी पीककर्ज योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत खरीप हंगामासाठी 52 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 हजार 362 कोटींचे रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात 58 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरण प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 32 हजार 721 दशलक्ष घनफुट असून 50 टक्के इतका आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात एकूण 5 लाख 69 हजार 313 हेक्टर क्षेत्रात 85 टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. संकटे कितीही आली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सदैव  त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी याप्रसंगी दिली आहे.
कोरोनाशी सामना करताना उद्योगधंदे चालू रहावेत व कष्टकऱ्यांच्या हाताला काम व अर्थकारणाला चालना मिळावी या हेतुने लॉकडाऊनच्या कालावधीतही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी 500 कंपन्या जिल्ह्यात सुरू होत्या. त्यानंतर मे महिन्यापर्यंत शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात साधारण 12 हजार उद्योग सुरु झाले आहेत, त्यात लाखो कामगार काम करत असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

‘ई स्काय व ई साय क्लिनिक’चे लोकार्पण 

कोरोना साथरोग काळामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पॉझिटिव्ह व गंभीर रुग्णांवर क्लाऊड फिजिशियनद्वारे रुग्णांचे मॉनेटरिंग करून ‘ई स्काय क्लिनिक’ चे लोकार्पण करण्यात आले. 
कोरोना काळात नागरिकांची व रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘ई साय क्लिनीक’द्वारे समुपदेशन करण्याचा उपक्रमाचा शुभारंभदेखील पालकमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला आहे. 

उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सत्कार 

पोलिस विभागात कर्तव्यावर असताना उत्तम प्रकारे कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्री  छगन भुजबळ यांच्या हस्ते पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे...

1 समीर शेख, सहायक पोलिस आयुक्त 2020 करिता युनियन होममिनिस्टर मेडल फॉर एक्सलन्स इन इनव्हेस्टिगेशन
2 सिताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक राष्ट्रपती पदक
3 विजय लोंढे, पोलिस उपनिरीक्षक राष्ट्रपती पदक
4 दानेश मन्सुरी, पोलिस उपनिरीक्षक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
5 संजय सांगळे, पोलिस निरीक्षक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
6 वाल्मीक बाविस्कर, पोलिस नाईक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
7 नितीन चंद्रात्रे, सहा. पोलिस उपनिरीक्षक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
8 श्याम गणपत वेताळ, सहा. पोलिस उपनिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण राष्ट्रपती पदक
9 समरसिंग द्वारकोजीराव साळवे, पोलिस उपअधिक्षक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
10 सुनिल शिवाजी आहेर, सहा. पोलिस उपनिरीक्षक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
11 जावेद इब्राहिम देशमुख, सहा. पोलिस उपनिरीक्षक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
12 भाऊसाहेब भागोजी ठाकरे, सहा. पोलिस उपनिरीक्षक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
13 दिलीप माणिकराव देशमुख, पोलिस हवालदार मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
14 शांताराम गोविंद नाठे, पोलिस हवालदार मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
15 आण्णासाहेब बामन रेवगडे, पोलिस हवालदार मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
16 तुषार श्रीराम पाटील, पोलिस हवालदार मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
17  भारत एकनाथ कादंळकर, पोलिस नाईक मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक
18 दिनेश वखार्ड्या सुर्यवंशी, पोलिस हवालदार, महाराष्ट्र पोलिस ॲकेडमी विशेष शाखेत उत्तम कामगिरी केले बाबत
19 सचिन विष्णू अहिरराव, पोलिस नाईक सेवेत सतत 15 वर्षे उत्तम अभिलेख राखलेबाबत.

सौ. डीआयओ,नाशिक