मधु ओझा
पुणतांबा| राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात मोठ्या प्रमाणात निवृत्तीनंतर शिक्षक,रेल्वे कर्मचारी व इतर कर्मचारी स्थायिक झाले. या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्ती वेतन राष्ट्रीय कृत बँकत वर्ग करण्यात येते.पुणतांबा येथे बँक ऑफ महाराष्ट्र ही एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने या निवृत्तीवेतनधारका सोबत, विविध सरकारी योजनांचे अनुदान लाभ घेणाऱ्या लाभार्थी जेष्ठ नागरिकांची बचत खाते, व्यापारी खाते, परिसरातील शेतकऱ्यांचे सीसी खाते या बँकेतच असल्याने शाखेत नेहमीच गर्दी असते,तर सर्व्हर डाऊन असेल तर दोनदोन दिवस व्यवहार ठप्प होतात. नागरिकांची हेळसांड तर होतेच परंतु आर्थिक कुचंबणा सहन करावी लागत आहे.
काही निवृत्ती वेतन धारकांचे वेतन हे श्रीरामपूर, कोपरगाव, राहता येथील राष्ट्रीयीकृत बॅंकेत असल्याने त्यांना एसटीने प्रवास करावा लागतो.पण सध्याच्या परिस्थितीत कोविड-19 च्या निर्देशानुसार 60 वर्षाच्या पुढील जेष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासासाठी बंदी घातल्याने त्यांना एसटीने प्रवास शक्य नाही, खाजगी वाहनाने जावे तर वाहनधारक १००० रुपये भाडे सांगतात आणि राज्य शासनाची निवृत्तीवेतन ७०० ते १००० असल्याने बँकेतून निवृत्तीवेतन कसे आणावे व कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा हा बिकट प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन व्यक्तीमध्ये अंतर राखण्याचे आवाहन केले जात असल्याने सर्व सरकारी कार्यालय,बँका, यातील कर्मचारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वारा बाहेरच नागरिकांना थांबवून स्वतः आत बसून काम करताय पण या बाहेर उभ्या केलेल्या नागरिकांना दोन व्यक्तीमध्ये अंतर राखण्यासाठी कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने प्रत्येक नागरिक आपले काम आधी व्हावे म्हणून या जेष्ठ नागरिकांना,महिलांना धक्काबुकीं करत आत घुसण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे, तरी या सर्व गोष्टीकडे शासन, प्रशासन लक्ष घालतील का अशी अपेक्षा जेष्ट नागरिकांतून व्यक्त होत आहे.