- !!🌹रानातलं बालपण🌹!! - TheAnchor

Breaking

August 10, 2020

!!🌹रानातलं बालपण🌹!!


!!🌹रानातलं बालपण🌹!!
फोटो: जी पी खैरनार

आजीचं होतो लाडके मी बाळं !
मजेत होता बालपणीचा काळ !!
आनंदी असे रोज नवी सकाळ !
आनंदाचा तेव्हा होता सुकाळ !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

ओसाड वावरी असायचं खळं !
खळ्यात असे पाचटाची चाळ !!
अंघोळीस असे तांब्याचा घंगळ !
अंगणी होतसे सकाळी अंघोळ !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

रानाच्या वस्ती असायचा मळा !
जेवाया असे कास्याच्या थाळा !!
आजी म्हणतसे जेवणारे बाळा !
लाडाने वाढतसे तुपाचा गोळा !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

थाळ्यात असे तांब्याची वाटी !
दाळीचं बेसन जिभेने चाटी !!
पाण्याला असे कास्याची लोटी !
पाणी पिण्या लावी लोटीस बुटी !!
घरात असायची खंडीभर पोरं !
 सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

आजोबा लावी मायेचा लळा !
खोबरा गोळी देई गोड बाळा !!
बालपणी बाळ होताच भोळा !
हातात देई बारीक खुळखुळा !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

शाळेला असे दिवाळीची सुट्टी !
खोडकर भावंड घेतसे कट्टी !!
वावरात असे आंब्याची ताटी !
गोड आंब्याची कोयच चाटी !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

आजी जरी खुप होती म्हातारी !
अतुट प्रेम साऱ्या नांतूवर करी !!
दगडाचं जातं असे आजी घरी !
आजी जात्याला भरभर फिरी !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

जात्यावर आजी दळतसे बाजरी !
जात्यांची गाणे गात असे न्यारी !!
लाकडी काठोटी थापुन भाकरी !
चुलीच्या भाकरी चवदार भारी !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!

जेवायला बसे सारी पोरंन पोरी !
पंगत बसती कोपीच्या ओसरी !!
आंबट आंब्याच्या कापुन कैरी !
घालुन लोणचं मातीच्या घागरी !!
घरात असायची खंडीभर पोरं !
सुखाने नांदायचं कुटुंब सारं !!
🌹🌳🌲🌴🌹🌴🌲🌳🌹
कवी:- जी.पी.खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१