पुणतांबा| दि. ७ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक होऊन साधक बाधक चर्चा झाली. त्यात १६ ठरावापैकी ९ ठरावावर सकारात्मक विचार झाला, ७० टक्के मागण्यांवर समाधान झाल्याचे ग्रामसभेत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितले. त्यामुळे पुणतांबा ग्रामसभेत तूर्तास आंदोलन थांबवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.
पुणतांबा येथे १ जूनपासून सुरू केलेले शेतकरी आंदोलन तूर्तास तरी थांबविण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. २३ मे रोजी पुणतांबा येथे विशेष शेतकरी ग्रामसभा आयोजित करून शेतकऱ्याच्या शेतमाल,विज,कर्ज व इतर अडचणीचे ठराव करून सरकारला निर्णय घेण्यासाठी १ जूनपर्यंतचे अल्टिमेट देण्यात आले होते, पण याची दखल सरकार दरबारी घेण्यात न आल्याने किसान क्रांतीतर्फे आंदोलन सुरू झाले. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी महसूल मंत्री,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी आंदोलक यांच्याशी चर्चा करत पाच दिवसानंतर संगमनेरला बैठकीला या म्हणून सांगितले त्यानंतर चौथ्या दिवशी कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी तीन तास चर्चा करून ७ जूनला उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक पक्की केली.उपमुख्यमंत्री यांच्या दालनात साधक बाधक चर्चा होऊन १६ ठरावापैकी ९ ठरावावर सकारात्मक विचार झाल्याने ७० टक्के मागण्यांवर समाधान झाल्याचे ग्रामसभेत सरपंच डॉ.धनंजय धनवटे यांनी सांगितले.
तर थकित विज बिलाचे व्याज दंड माफ होणार. कृषीपंपाचा पन्नास टक्के विज बिल माफ करणार. राज्यसरकारकडून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. कृषीसाठी दिवसा विज देण्यासाठी प्रयत्न करणार. पूर्ण विजबिल भरणारास सोलर पंप दिले जाणार.सोलर पंपासाठी ६०% अनुदान दिले जाणार. १५ जुनपर्यंत ऊसाचे गाळप, गाळपाविना ऊस शिल्लक राहीला तर अनुदान दिले जाणार. १५ जुननंतर आढावा घेऊन सरकार ऊसाला अनुदान देणार. गाळपासाठी गेलेल्या ऊसाला प्रतीटन एक हजार देण्यास सरकारचा नकार.
कांद्याला अनुदान देण्यास सरकारचा नकार, कांद्याच्या हमीभावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार,आयात निर्यात धोरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, दुधाच्या एआरपीसाठी कमेटी गठीत होणार, भारतभर दुधाचा एकच दर राहावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार,दुध दराच्या तफावतीमुळे दुधाला हमीभाव देणं अशक्य,फळे आणी भाजीपाल्याचे दर निश्चित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा,नियमित कर्ज भरणारांना 50 हजार रूपये अनुदान दिले जाणार,एक जुलैपासून अनुदान थेट कर्जदाराच्या खात्यावर जमा होणार,राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार कोटी मिळणार, दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणारांनाही मिळणार लवकरच कर्जमाफी,दोन लाखाच्या पुढची बाकी शेतकऱ्यांना भरावी लागणार,राज्यसरकार घेणार लवकरच निर्णय, कांदा गव्हासह इतर आयात निर्यात धोरणासाठी राज्यसरकारचं शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणार, मागेल त्या शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणार, सॅटेलाईट व्दारे पिकपाहणीसाठी यंत्रणा उभारणार, खतांच्या अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा,पाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना विहीर देणार,शेतकरी कुटुंबासाठी दोन लाख रूपयांचा विमा, २०१७ साली झालेल्या शेतकरी संप आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणार,सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा जिवीतहानी नसेल तर गुन्हे मागे घेतले जाणार,कृषी मुल्य आयोगाला महिनाभरात अध्यक्ष नेमणार अशी आश्वासने मिळाली असल्याची माहिती विठ्लराव जाधव यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली.
शेवटी सुहास वहाडणे यांनी आंदोलन थांबविण्यात येत असल्याचा ठराव मांडला या ठरावाला बाळासाहेब चव्हाण यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.अश्या प्रकारे ग्रामसभेतून सुरू झालेले आंदोलन ग्रामसभा घेऊन तूर्तास तीन महिन्यांसाठी थांबविण्यात आले आहे.या ग्रामसभेला राहाता तालुका नायब तहसीलदार, पुणतांबा तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल,यांच्या सह किसान क्रांती कोअर कमिटी,सदस्य बरोबर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.