मुंबई|प्रतिनिधी| ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या वतीने सोळा वर्षांखालील खेळाडूंच्या यादीत नाशिक येथील जैश्णव बाजीराव शिंदे यास ११ व्या स्थानी मानांकन प्राप्त झाले आहे. असोसिएशनद्वारा जाहीर करण्यात आलेल्या ५१ खेळाडूंच्या मानांकन यादीत जैश्णव हा महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.
जैष्णव याने राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक टेनिस स्पर्धांमध्ये सहभागी होऊन नैपुण्य प्राप्त केले आहे. एवढ्या कमी वयात स्पर्धांमधील सहभाग आणि यश प्राप्त करणारा तो एकमेव खेळाडू आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आपण सज्ज असून त्यामध्ये हमखास विजयी होऊन नाशिकचे नाव उज्ज्वल करू, असा आत्मविश्वास जैश्णव याने व्यक्त केला आहे. दरम्यान, जैश्णव याला प्राप्त झालेल्या मानांकनाबाबत त्याच्यावर महाराष्ट्रातील क्रीडा जगतातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी बाजीराव शिंदे यांचा जैश्णव हा सुपुत्र आहे.