- नॅशनल बुक ट्रस्टच्या बालसाहित्य अनुवाद पुस्तकांचे प्रकाशन - TheAnchor

Breaking

January 19, 2021

नॅशनल बुक ट्रस्टच्या बालसाहित्य अनुवाद पुस्तकांचे प्रकाशन

नाशिक| नवी दिल्ली येथील नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यातर्फे बाल साहित्य मराठी अनुवाद कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यात सहभागी लेखकांच्या पुस्तकांचा प्रकाशनाचा कार्यक्रम कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर एनबीटीच्या मराठी संपादिका निवेदिता मदाने-वैशंपायन, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. स्वप्नील तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
Publication-of-children-literature-translation-books-of-National-Book-Trust
एनबीटीच्या मराठी संपादिका निवेदिता मदाने - वैशंपायन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नॅशनल बुक ट्रस्ट ही केंद्र शासनातर्फे साहित्याचा प्रसार, प्रचार व विकास करण्यासाठी स्थापना झालेली संस्था आहे. ट्रस्टतर्फे चाळीसपेक्षा अधिक भाषांमध्ये कामकाज सुरु आहे. विशेषतः बालसाहित्यावर अधिक भर दिला जात आहे. नाशिक येथे गेल्यावर्षी अनुवाद कार्यशाळा व्यासातर्फे घेण्यात आली होती. त्यात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यातून लेखकांच्या अनुवादीत पुस्तकांचे प्रकाशन आज करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सांगितले की, मोबाईल गेम्समुळे मुलांचे भावविश्व संपत चालले आहे. ही अत्यंत धोकादायक बाब आहे. बाल साहित्यामुळे मुलांचे भावविश्व कायम राहू शकते. शिक्षकांनी व पालकांनी यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, लेखक जेथे थांबतो तेथून पुढे अनुवादक चालतो. शब्दाला शब्द देणे म्हणजे अनुवाद नव्हे. अनुवादामध्ये मुळ लेखकाच्या भावना आणि त्याने निर्मिलेले वातावरण आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न म्हणजेच यशस्वी अनुवाद होय असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी राधिका गोडबोले, सुजाता बाबर, किरण काळे, वंदना अत्रे, प्रथमा पुंडे, भाग्यश्री गुजर, भावना कुलकर्णी-भालेराव, गौरी जोशी, सुवर्णा चव्हाण, प्रा. नागार्जुन वाडेकर आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भावना कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन भाग्यश्री गुजर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरी जोशी यांनी केले. या कार्यक्रमात कोविड-19 संदर्भात शासनाने निर्देशित केलेल्या सुचनांचे पालन करण्यात आले.