नाशिक| स्थिर आकार संबंधीच्या प्रश्नावर अर्थमंत्री उद्योग मंत्री आणि ऊर्जामंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेऊ तसेच स्थिर आकार रद्द करण्यासाठी वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळास दिले.
वीज दरासंदर्भात व्यापारी उद्योजकांच्या अडचणींबाबत कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रि.चे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, चेंबरचे विश्वस्त श्री.आशिष पेडणेकर, माजी उपाध्यक्ष श्री.करुणाकर शेट्टी, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, राजीव पाटील, सचिन शिरगांवकर, रणजित शहा, मोहन गुरनानी, भावेश मानेक, सरकार्यवाह सागर नागरे यांच्या शिष्टमंडळाने ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेतली.
२३ मार्च पासून संपूर्ण देशात आणि राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे जून अखेरपर्यंत उद्योग व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती,पर्यायाने अर्थचक्र थंडावले आहे. आज ५ महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही फारशी सुधारणा झालेल्या नाही त्यातच महावितरणने अवास्तव वीजबिले पाठवून उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत सातत्याने ऊर्जामंत्री, उद्योगमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदने पाठवून बंद काळातील वीज बिलांचा स्थिर आकार रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र चेंबरने केली होती. याबाबत आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे बैठक झाली. त्यावेळी स्थिर आकारया बरोबरच उद्योजकांना जाणवणाऱ्या इतर अडचणीबाबतही चर्चा झाली. या चर्चेप्रसंगी चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, संजय शेटे, राजीव पाटील, सचिन शिरगांवकर, रणजित शहा, मोहन गुरनानी, भावेश मानेक, सागर नागरे यांनी भेट घेतली.
चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी वीज बिलासंदर्भातील व्यापारी उद्योजकांच्या अडचणी मांडल्या. त्यात स्थिर आकार रद्द करणे, केव्हीएच बिलिंग प्रणालीऐवजी जुन्या पद्धतीनेच बिल आकारणी करावी, मराठवाडा व विदर्भाकरता जाहीर केलेली सबसिडी त्वरित देण्यात यावी, वस्त्रोद्योगासाठी जाहीर केलेली वीज बिलाची सवलत पूर्वलक्षी पद्धतीने फेब्रुवारी २०१८ पासून देण्यात यावी. राज्यातील विजेचे दर शेजारील राज्यापेक्षा जास्त असल्याने उद्योगांना स्पर्धा करणे कठीण होते त्यामुळे वीज दर कमी करावे अशी मागणी केली. कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी यावेळी सांगिलते कि, कोरोनामुळे व्यापार उद्योग बंद आहेत त्यातच अवास्तव वीजबीलांची भर पडल्याने व्यापारी उद्योजक त्रस्त आहेत. त्यांच्या भावना तीव्र असून वीजदर कमी करणे आवश्यक असून आपण व्यापारी उद्योजकांच्याबरोबर असल्याची भूमिका ऊर्जा मंत्र्यांकडे मांडली. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी एप्रिल २०२० पासून लागू केलेल्या वीजदरवाढीच्या निर्णयास स्थगिती द्यावी अशी मागणी केली. यानंतर शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व याप्रकरणी लक्ष घालून व्यापारी उद्योजकांना दिलासा मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली.