- ऑनलाइन सोने खरेदी-विक्रीद्वारे 10 कोटींची उलाढाल: सराफांसाठी ई-मार्केट ठरतंय फायदेशीर - TheAnchor

Breaking

October 31, 2020

ऑनलाइन सोने खरेदी-विक्रीद्वारे 10 कोटींची उलाढाल: सराफांसाठी ई-मार्केट ठरतंय फायदेशीर

नाशिक| प्रतिनिधी| सराफी व्यवसायिकांनी ई- मार्केटचा आधार घेत आपली ऑनलाइन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. ऑनलाइन द्वारे ग्राहकांकडून सुमारे १० कोटींची उलाढाल झाली आहे, अशी माहिती नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली. खास करून खरेदीसाठी २५ ते ४५ वयोगटातील ग्राहकांचा विशेष प्रतिसाद दिसून आला. 
10-crore-turnover-from-online-gold-trading-E-market-is-profitable-for-bullion
फोटो: फाईल
चोखंदळ ग्राहक नेहमी सोने खरेदीसाठी आपल्या पसंतीच्या सराफी पेढीत जातो. कारण ती वस्तू खात्रीशीर असणार याचा विश्वास असतो. मात्र महामारीच्या काळात ग्राहकांना प्रत्यक्ष सोने खरेदी टाळावी लागली. लग्नसोहळा आणि महत्वाच्या सणासुदीच्या काळात सोने खरेदीसाठी पडावे की नाही असा सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न होता. याकाळात  ग्राहकांची सुरक्षा ही महत्वाची बाब होती. 

कोरोना संकट काळात सराफ व्यवसायिकांच्या व्यवसायावर देखील आर्थिक संकट आले. ग्राहक बाजारातून गायब झाल्याने व्यवसायावर परिणाम झाला, त्यामुळे सराफी व्यवसायिकांसमोर झालेले आर्थिक नुकसान कसे भरून काढणार असा प्रश्न होताच. तशात सर्वत्र ई- कॉमर्स व्यवसायाने पाय पसरले होते, ग्राहक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले, त्यामुळे ऑनलाईन खरेदीला मोठे महत्व आले होते. ई-मार्केटचा उपयोग करून कपडे, किराणा, फर्निचर, यासह सर्व प्रकारची खरेदी- विक्री ऑनलाइन फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केली जात असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. आता सराफी व्यवसायिक देखील याकडे वळाले आहे आणि ई- मार्केटचा फायदा घेत आहे.
 
याच कालावधीत काही सराफी व्यवसायिकांनी ई- मार्केटचा आधार घेत आपली ऑनलाइन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. त्याद्वारे दसरा दरम्यान ग्राहकांकडून सुमारे ८ ते १० कोटींची उलाढाल झाली. यात युवा वर्गाची संख्या मोठी होती. आता सराफी व्यवसायिक देखील काळाप्रमाणे बदलत आहे. भलेही ही ऑनलाईन खरेदी मर्यादा सध्या १५ हजारापर्यंत दिसून आली आहे, कालांतराने ती वाढेल असा विश्वास चेतन राजापूरकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच  सोशल माध्यमाचा व्यवसायासाठी चांगला वापर केला जात आहे 

छोटया व्यावसायिकांकडून सोशल माध्यमाचा वापर: चेतन राजापूरकर

ऑनलाइन मध्ये सोशल माध्यमाचा ही वापर करण्यात आला, फेसबूक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्रामद्वारे सोन्याच्या दागिन्यांचे वेगवेगळया प्रकारचे आकर्षक डिझाईन ग्राहकांना पाठवून त्यांची संमती घेतली जाते, हव्या त्या डिझाइनचे दागिने त्यांना घरपोच किंवा त्यांना हवे त्याठिकाणी उपलब्ध करून दिले जातात

चेतन राजापूरकर अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन.