नाशिक| राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर महिला अत्याचाराचा गंभीर आरोप असतांना राष्ट्रवादीने कोणतीच कारवाई केली नाही. मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपा महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. आ. फरांदे यांच्या नेतृत्वखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
फेसबुक पोस्टद्वारे काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांच्याशी परस्परसंमतीने विवाहबाह्य संबधातून त्यांना एक मुलगी व एक मुलगा अशी दोन अपत्य असल्याची कबुली दिली होती. त्या मुलांना धनंजय मुंडे यांनी स्वतचे नाव दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. हा सर्व प्रकार धनंजय मुंडे यांच्या लग्नाच्या पत्नीला व मुलांना माहिती आहे असा उल्लेख त्यांनी केलेला होता. त्यांच्या फेसबुक पोस्टवरून त्यांना एकूण पाच अपत्य असल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांच्या बहिणीने बलात्कार व लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केलेले होते असे आ. फरांदे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने सामाजिक बांधिलकी व सामाजिक भान ठेवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतलेला नाही. तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील नैतिकचे भान ठेवून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. परंतु त्यांनी देखील राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनामा द्यावा अशी मागणी आ. देवयानी फरांदे यांनी यावेळी केली. याप्रसंगी आ.सीमाताई हिरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा हिमगौरी आहेर - आडके, महिला मोर्चा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी, चिटणीस रोहिणी नायडू, नगरसेविका स्वाती भामरे, यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.