- येवला येथील प्रलंबित देवना साठवण तलावाचा प्रश्न अखेर मार्गी,योजनेस प्रशासकीय मान्यता - TheAnchor

Breaking

January 19, 2021

येवला येथील प्रलंबित देवना साठवण तलावाचा प्रश्न अखेर मार्गी,योजनेस प्रशासकीय मान्यता

मुंबई|नाशिक| येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागासाठी जीवनदायी असलेला आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या देवना साठवण तलावाचा प्रश्न अखेर आज मार्गी लागला असून या योजनेस शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.  
The-issue-of-pending-Devna-storage-lake-at-Yeola-has-finally-been-resolved-administrative-approval-to-the-scheme
येवला तालुक्यातील उत्तरपूर्व भागासाठी असलेल्या देवना साठवण तलावाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या योजनेस आज राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामुळे येवल्यातील उत्तरपूर्व भागातील पाणी प्रश्न सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

येवला तालुक्यातील खरवंडी व देवदरी या गावाजवळील मन्याड नदीच्या दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर देवना साठवण बंधाऱ्याचे काम प्रस्तावित आहे. तापी खोऱ्याच्या बृहत आराखड्यात सदर प्रकल्प भविष्यकालीन प्रकल्प म्हणून प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी मा.मुख्य अभियंता नियोजन व जलविज्ञान कार्यालय, नाशिक यांचे पत्र दि.२० जानेवारी २०१४ अन्वये १.८५ दलघमी (६५.३३ दलघफू) पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध झालेले आहे. प्रस्तावित धरण संरेखेपासून १८ चौकिमी पाणलोट क्षेत्र आहे. मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांचेकडून योजनेच्या मातीधरणाचे काटछेदाचे संकल्पन करण्यात आलेले आहे. तसेच एस.एल.टी.ए.सी.कडून सदर प्रकल्पाची छाननी झालेली असून सदर प्रकल्पासाठी रक्कम रु. १२.७७ कोटी खर्च अपेक्षित आहे. येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागासाठी हा प्रकल्प जीवनदायी असल्याने साठवण तलाव देवना या योजनेस जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी दिलेल्या होत्या.त्यानुसार आज सदर योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

सदर योजना ही नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असून येवला तालुक्यातील देवदरी, खरवंडी, राहडी, कोळम खु. या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी व रोपवाटिकेसही लाभ होणार आहे. 

या प्रकल्पाठी वैजापूर तालुक्यातील १३ हेक्टर व येवला तालुक्यातील ४४ हेक्टर अशी एकूण ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येत आहे. त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र खाजगी आहे. या मातीच्या धरणाची लांबी २२५ मीटर इतकी असून धरणाची उंची हि १६.१८ मीटर तर सांडव्याची लांबी ९० मीटर इतकी असणार आहे. या परिसरात २.८ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. या साठवण तलावात त्यापैकी १.८५ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्यात येऊन या प्रकल्पाची सिंचन क्षमता ३५८ हेक्टर इतकी असणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना या साठवण तलावाचा मोठा फायदा मिळणार आहे.

आमचा दुष्काळ आता लवकर संपेल
आमचे अनेक पिढ्यांचे स्वप्न साकार होणार असून आमचा दुष्काळ लवकरच संपेल अशी आशा निर्माण झाली आहे. ना. भुजबळ यांचे पाठीशी परिसरातील जनता खंबीरपणे उभी राहील - 

जगनराव मोरे,लाभार्थी शेतकरी.

 
१३ कोटीची प्रशासकीय मान्यता हा मोठा टप्पा
13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळणे हा या प्रकल्पातील मोठा टप्पा आहे. वन जमिन अधिग्रहण, प्रत्यक्ष उभारणी आदि कामे लवकरात लवकर मार्गी लागतील यासाठी पालकमंत्री भुजबळ यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरूच राहील
               भागवतराव सोनवणे
  अध्यक्ष देवनाचा प्रकल्प कृती समिती


असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प :-

एकुण खर्च मान्यता 12 कोटी 77 लाख
लाभार्थी गावे :- राहाडी खरवंडी , देवदरी
सिंचन क्षमता 358 
उपलब्ध होणारे पाणी 65.33 दश लक्ष घनफुट
धरणाची लांबी 225 मीटर
धरणाची उंची 16.18 मीटर
सांडव्याची लांबी 90 मी
बुडीत क्षेत्र 57 हेक्टर