- भुजबळ म्हणजे शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व: शरद पवार - TheAnchor

Breaking

October 13, 2022

भुजबळ म्हणजे शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व: शरद पवार

मुंबई| दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम  छगन भुजबळ यांनी केलं असचं काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभं केलं. कुठल्याही कामचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ याचं नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. अशा शब्दात भुजबळ यांच्या कार्याचा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी गौरव केला.
Chhagan-Bhujbals-birthday-celebration-mumbai-shamukhanand-sabhagruh
छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ गौरव समितीच्या वतीने मुंबईतील ‘षण्मुखानंद’ सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा.शरदचंद्र पवार हे बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ‘बहुजनांचा नायक छगन भुजबळ'’ व फोटोबायग्राफीचे पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पवार पुढे म्हणाले, त्यांनी अनेक  खस्ता खाल्या. शिवसेनेचे नेतृत्व, नगरसेवक, पहिले आमदार, महापौर होत मुंबईचे नेतृत्व त्यांनी केले. पायाभूत विकास केला. पुढे विधानसभा, विरोधी पक्ष नेता, मंत्री म्हणून काम करताना विकासाला दिशा देण्याचे आगळे वेगळे काम केले. देशात विकास करणारा उत्तम राजकारणी नेते म्हणून भुजबळांचा उल्लेख करावा लागेल या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांचा गौरव केला.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष खा.डॉ.फारुख अब्दुल्ला, माजी राज्यसभा सदस्य प्रज्ञावंत साहित्यिक डॉ.जावेद अख्तर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, गौरव समितीचे खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार कपिल पाटील, आमदार सचिन अहिर,राजेश टोपे,माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डीएमकेचे आली शेख मिरान, माजी खासदार राजकुमार सैनी, मोतीलाल साखला, समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बहुजनांचा नायक छगन भुजबळ' पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान, विजय सामंत प्रकाशक अरविंद शाह यांच्यासह कुटुंबातील सदस्य व देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार म्हणाले की,  आज अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण याच सभागृहात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची स्थापना करण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर लगेच त्यांच्याच अध्यक्षतेखाली शिवाजीपार्कवर मेळावा देखील पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. कोणतेही काम हाती घेतलं की ते उत्तम व नेटकं करायचे ही छगन भुजबळ यांची खासियत या शब्दात त्यांनी भुजबळांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.  

ते म्हणाले की,  छगन भुजबळ हे माझे ज्येष्ठ सहकारी असून त्यांची ६१ वी व आता अमृतमहोत्सला उपस्थित आहे. मी त्यांच्या कायम पाठिशी आहे. देशात सावित्रीबाई, महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्याचे काम भुजबळ करत आहे. मी ज्या पुणे विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला फुले यांचे नाव भुजबळांमुळे मिळाले याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. तसेच देशात काश्मीर राहण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांच्या वडिलांचे योगदान अतिशय महत्वाचे राहिले. देशात एकात्मता टिकविण्यासाठी फारूक अब्दुल्ला यांनी केले. ते आज छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहिले हा आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


*विचारांची लढाई लढणाऱ्या नेत्यांमध्ये भुजबळांचे स्थान आदराचे - फारुक अब्दु्ल्ला*

*सध्या धार्मिकतेच्या नावाखाली देश दुभगला जात आहे – डॉ. फारुक अब्दुल्ला*

यावेळी विचारांची लढाई लढणाऱ्या नेत्यांमध्ये भुजबळांचे स्थान आदराचे आहे अशी स्तुतीसुमने फारुक अब्दुल्ला यांनी भुजबळ यांच्यावर उधळली

यावेळी फारुक अब्दुल्ला म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. पण सध्या धार्मिकतेच्या नावाखाली देश दुभगला जात आहे. राम फक्त हिंदुचा नाही तर तो सर्वांचा ‍आहे. देशाची एकजुटता धोक्यात आहे. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा अनेक समस्या आहेत. या संकटातून मार्ग काढावा लागेल. देशात काहीजणांना रावणासारखा मी पणा आल्याची टीका त्यांनी अप्रत्यक्ष केंद्र सरकारवर केली. मी मुस्लिम आहे पण भारतीय मुस्लिम आहे. चीनी नाही. 'जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा' या गीतातून भाईचार्यामचा संदेश देत लोकांच ऐक्यच देशाला वाचवेल असा संदेश देत त्यांनी छगन भुजबळांना शुभेच्छा दिल्या.




देशाला हजारो वर्षापासून लाभलेली सुसंस्कृत परंपरा कायम रहायला हवी - साहित्यिक डॉ.जावेद अख्तर*


*भुजबळांचा साहित्य क्षेत्रातील वावर वाखण्या जोगा, कलाकारांच्या मदतीला धावून जाणारा नेता- जावेद अख्तर*

यावेळी डॉ.जावेद अख्तर म्हणाले की, आम्ही सांगतो तेच खरे असे जिथे सांगितले जाते तिथे लोकशाही नांदत नाही. आपल्या देशात मात्र लोकशाही अद्याप जिवंत आहे. त्यामागे देशाची विचारधारा आहे. मात्र आज देशात विभिन्नतेत एकता असतांना ती तोडण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून केला जात आहे. याचा आपल्याला विचार करायला हवा. देशात चुकीच्या गोष्टींबाबत आपण आवाज उठवायला हवा. कारण आपल्या देशाला हजारो वर्षापासून सुसंस्कृत अशी परंपरा लाभलेली आहे. ती कायम राहिला हवी यासाठी सर्वांनी एकत्रित राहायला हवे असे सांगत छगन भुजबळ यांच्या विविध आठवणीना उजाळा त्यांनी दिला.