नाशिकरोड |प्रतिनिधी| कोळसा वाहतुकीसाठी किसान ट्रेन गेल्या काही महिन्यांपासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा व शहरातील शेतक-यांचे रोजचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने 11 ऑक्टोबरपासून स्पेशल पार्सल ट्रेन सुरु केली आहे,अशी, माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांनी दिली.
देवळाली कॅम्प ते मुझ्झफरपूर (बिहार) दरम्यान ही स्पेशल पार्सल ट्रेन आज नाशिकरोडला येताच तीचे स्वागत करण्यात आले. दर आठवड्याला मंगळवारी आणि शनिवारी ही गाडी धावेल. पार्सल ट्रेन 15 डब्यांची असून तिला मिळणारा प्रतिसाद पाहून फे-यांचे दिवस वाढविण्यात येणार असल्याचे मानसपुरे यांनी सांगितले. पार्सल ट्रेनमुळे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार येथे कमी खर्चात शेतीमाल पाठवून मालाला चांगली किमत मिळवणे शेतक-यांना शक्य होणार आहे. प्रवासी रेल्वे गाड्यांप्रमाणेच ही पार्सल ट्रेन वेळेत व वेगात निर्धारीत स्थळी पोहचणार आहे. त्यामुळे गाडीव्दारे माल पाठविणा-या ग्राहकांना चांगली वाहतूक सेवा मिळणार आहे. शेत-यांचा दूध, भाजीपाला, फळभाज्यासारख्या नाशवंत वस्तू तर उद्योजकांना औद्योगिक वस्तू, नागरिकांना खासगी पार्सल या ट्रेनव्दारे पाठवता येणार आहे. किसान ट्रेनला विशेष अनुदान असल्यामुळे शेतीमाल पाठविणा-यांचा दुहेरी फायदा व्हायचा. एकतर पिकाला परराज्यातही चांगला भाव मिळायचा तसेच माल पाठविण्यासाठी अनुदान मिळायचे. मात्र, किसान ट्रेन बंद ठेवल्याने या फायद्यापासून शेतकरी वंचित आहेत. नवीन पार्सल ट्रेनचा वेग व सेवा चांगली असली तरी यातून माल पाठविण्यासाठी भाड्यात कोणतीही सूट किंवा सरकारचे अनुदान नाही. त्यामुळे पार्सल ट्रेनला शेतक-यांचा प्रतिसाद कमी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कार्टिंग एजेंट कमेलश मोगल, भास्कर नरवडे, रमेश चावला यांनी सांगितले की, पार्सल ट्रेन सकाळी 11 वाजता सुटणार आहे. नाशिकरोडला माल रात्री येऊन पडणार असल्याने सकाळपर्यंत तो खराब होऊ शकतो. त्यामुळे पार्सल ट्रेन रात्री 11 वाजता सोडावी. किसान ट्रेनला 50 टक्के अनुदान होते. पार्सल ट्रेनमध्ये शेतक-यांना 20 ते 25 टक्के अनुदान दिल्यास व गाडी आठवड्यातून किमान तीन दिवस चालवल्यास शेतक-यांना न्याय व रेल्वेला मोठा महसूल मिळेल. किसान ट्रेन बंद असल्याने सध्या प्रवाशी गाड्यांच्या सामानाच्या बोगींमधून शेतीमाल पाठवला जातो. मात्र, हे डबे खासग्या कंपन्या मुंबईतच बुक करतात. त्यामुळे नाशिकच्या शेतीमालाला जागा राहत नाही. पार्सल ट्रेनमुळे उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहारला शेती माल जाईल. तथापी, दिल्ली व कोलकत्यासाठी पार्सल ट्रेन नाही. तेथे चांगली मागणी असूनही शेती माल पाठवता येत नाही. दिल्ली व कोलकत्यासाठी आठवड्याला तीन गाड्या धावतात. त्यातील शेती व अन्य सामानाचे डबे मुंबईतच भरतात. त्यामुळे नाशिकच्या शेतक-यांच्या मालासाठी जागाच राहत नाही. या गाड्यांमध्ये नाशिकसाठी किमान एक डबा राखीव ठेवल्यास व गाडी नाशिकरोडला पाच मिनिटे थांबल्यास शेतक-यांना गॅरन्टी मिळून गाडीला प्रतिसाद वाढेल. बंद असलेल्या किसान ट्रेनच्या बोगी प्रवाशी गाड्यांना जोडून त्यातूनही शेतीमाल पाठवावा. मध्य रेल्वेने 7 आगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान ट्रेन पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून सुरु केली. देवळालीहून आठवड्यातून चार किसान ट्रेन चालायच्या त्यातून दर दिवसाला दीडशे तर नाशिकरोडहून चार बोगीतून दर दिवसाला शंभर टन शेतीमाल जायचा. महाराष्ट्रात सहा किसान ट्रेन सुरु झाल्या. जानेवारी 2022 पर्यंत एकट्या मध्य रेल्वेमार्गावर एक हजार फे-या करून किसान ट्रेनने 260 कोटींचा महसूल मिळवून दिला. कोळसा वाहतूकासाठी किसान ट्रेन 13 एप्रिलपासून बंद आहे. 30 हजार जणांचा रोजगार बुडत आहे. लाखो रुपयांचे शेतीमालाचे रोज नुकसान होत आहे. नवीन पार्सल ट्रेनमुळे काही प्रमाणात शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. नाशिकरोडला दहा ते पंधरा कार्टिंग एजन्ट (व्यापारी) आहेत. त्या सर्वांकडे मिळून दीडशे मुले कामाला आहेत. पिकअप, ट्रकचालक-वाहक, प्रत्येक स्थानकावरील हमाल, भाजीविक्रेते असे हजारो लोक किसान ट्रेनवर अवलंबून आहेत. किसान ट्रेन बंद असल्यामुळे सध्या पन्नासच लोक कामाला आहेत. पार्सल ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळाला तर रोजगारही वाढणार आहे.