नाशिक| मानसिक आरोग्यदिनाचे औचित्य साधून 'समुपदेशन' करताना ते कसे करावे त्याच्या पद्धती, शास्त्र आदी बाबी नाट्य आविष्कारातून मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थितांसमोर उलगडल्या. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही समुपदेशनाचे बारकावे सांगितले.
दोन वर्षांपूर्वी शहरात स्थापन झालेल्या इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आय. पी. एच.) माईंडलॅब आणि कुलकर्णी हॉस्पिटल यांच्यातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘कानामात्रा, कानमंत्र, कॉऊन्सेलिंगचे’ हा आगळावेगळा स्टेज शो झाला. यामध्ये ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासह येथील डॉ. शिरीष सुळे व शिर्डी येथील मनोविकारतज्ज्ञ डॉ. ओंकार जोशी यांनी हसतखेळत आणि रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले.
यामध्ये कॉऊन्सेलिंग अर्थात् समुपदेशन म्हणजे नेमके काय? समुपदेशनामध्ये उपदेश कोणता आणि कसा असावा? मानसिक आजारांच्या उपचारात समुपदेशन कसे वापरावे? त्यातील शास्त्र नेमके कोणते? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे उत्स्फुर्त नाट्यानुभव अर्थात ‘रोल- प्लेज’च्या माध्यमातून देण्यात आली. तसेच, डॉ. नाडकर्णी यांनी विविध प्रसंगांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकांद्वारे समुपदेशनाची एकुणच प्रक्रिया उलगडून दाखवली. माईंडलॅब उपक्रमाच्या मानसशास्त्रज्ञ संघाचे त्यासाठी सहकार्य लाभले. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात मानसशास्त्र विषयाच्या अभ्यासकांबरोबरच सुजाण नागरिक, डॉक्टर, विद्यार्थी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. ऋचा सुळे यांनी संयोजन केले.