- ‘उर्मिला’ कादंबरीचे ले.जनरल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते प्रकाशन - TheAnchor

Breaking

October 10, 2022

‘उर्मिला’ कादंबरीचे ले.जनरल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे| युवा कादंबरीकार समर याने लिहिलेल्या ‘उर्मिला : एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास’ या कादंबरीचे प्रकाशन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू आणि  लेफ्टनंट जनरल डॉ.माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले. 
Publication-of-novel-Urmila-by-Lt-Gen-Madhuri-Kanitkar
यावेळी लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), डॉ.किरण मोघे, श्रुती मोघे  उपस्थित होते. लेखनासाठी अत्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून विषयाची निवड केल्याबद्दल समर याचे कौतुक करताना डॉ. कानिटकर म्हणाल्या, रामायण मुख्यतः श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या जीवनावर आधारित महाकाव्य आहे. मात्र या महाकाव्यात उर्मिलेसारख्या सहयोगी व्यक्तीरेखाही आहेत, ज्यांच्याशिवाय ती कथा पूर्ण होत नाही. उर्मिलेच्या अज्ञात जीवनाला वाचकांसमोर आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.पूर्वीपासून आपल्याकडे असं म्हटलं जातं की कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एका सक्षम, खंबीर स्त्रीचा हात असतो. एक गृहिणी जेव्हा घर सांभाळायची, तेव्हाच पुरुष निश्चिंतपणे यशाची शिखरं पादाक्रांत करू शकायचा. उर्मिलेचं आणि लक्ष्मणाचं जीवनही असंच आहे. त्यांचा भावबंध या कादंबरीच्या रूपाने मराठी वाचकांसमोर आणल्याबद्दल त्यांनी लेखकाचे अभिनंदन केले. देशाच्या सीमेवर  पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकांच्या पराक्रमामागे त्या कुटुंबातील स्त्रीचा त्याग असतो असेही त्या म्हणाल्या. 

२२ वर्षीय समर याची ही तिसरी कादंबरी आहे. यापूर्वी  ‘तथागत’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या दोन कादंबऱ्यांसह आणि ‘महाकाव्य शिवप्रताप’ प्रकाशित झाले आहे. ‘उर्मिला’ ही त्याच्या ऐतिहासिक कादंबरी मालिकेतील तिसरी कादंबरी आहे. समर याने याव्यतिरिक्त नाट्यलेखन आणि स्तंभलेखनही केले आहे.