भगूर/प्रतिनिधी: कोरोना महामारी विरूद्ध लढत असतांना महिला कामगारांनी आपल्या आरोग्याची निगा ठेवणे महत्वाचे आहे. तसेच मासिक पाळी हा खासगी विषय न मानता तो महिला भगिनींचा निसर्गदत्त अधिकार असून त्यावर उघडपणे चर्चा होणे काळाची गरज आहे असे मत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आज येथे व्यक्त केले. जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त महिला कामगारांना त्यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप झाले त्याप्रसंगी त्याबोलत होत्या.
नागरीकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महिला स्वच्छता कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यांच्या कार्याला सलाम करत कोरोना विरूद्धचा लढा अधिक सक्षमतेने देता यावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यांचा आत्मविश्वास असाच अबाधित राहो यासाठी आपले ही काही दायित्व आहे. त्यासाठी जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून महिला कामगारांच्या आरोग्याचा विचार करुन
झेप फाऊंडेशनच्या वतीने सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सेफऐव्हर कंपनीचे संचालक उपस्थित होते,
यावेळी मार्गदर्शन करताना, बलकवडे म्हणाल्या की, महिला कोरोना योद्ध्यानी काम करत असतांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच महत्वाचे आहे. मासिक पाळी हा वैयक्तिक किंवा खाजगी विषय मानू नये, अशा महत्त्वाच्या विषयावर उघडपणे आपले मत मांडायला हवे. तो महिलांचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यामुळे न लाजता निसंकोच पणे बोलायला हवे असे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी सेफऐव्हर कंपनीचे संचालक नितीन उगले यांनी मासिक पाळीत महिलांनी ५ दिवस विशेष काळजी घ्यावी असे सांगितले, त्यासाठी योग्य सॅनिटरी पॅडचा वापर करावा तसेच या काळात पुरुषांनी त्यांना मानसिक आधार द्यायला हवा सध्याच्या विज्ञान युगातील काळात जुन्या रूढींना महत्व देऊ नये असे आवाहन ही त्यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते गोरखनाथ बलकवडे, प्रा सचिन उगले आदि उपस्थित होते.

