औरंगाबाद- मनपाच्या ताप केंद्रातील अनास्था, सह रुग्णांचे हाल, मिनी घाटीत कर्मचाऱ्यांनी घेतलेली काळजी व काही राजकीय पुढाऱ्यांनी दाखविलेला बालीशपणा असे संमिश्र अनुभव घेतले. घाबरुन जाऊ नका, धैर्यानेच कोरोनाला हरविणे सहज शक्य आहे, कोरोनाचा पराभव करुन सुखरुप घरी परतलेले पत्रकार तुषार वखरे सांगत होते.
![]() |
| फोटो: फाईल |
ते म्हणाले, आरोग्य विषयक वार्तांकन करीत असल्याने शहरात पहिला रुग्ण आढळला, तेव्हापासून दररोज घाटी व मिनीघाटी रुग्णालयात जात होतो. मागील महिन्यात आईला काही लक्षणे जाणवू लागली. फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घेऊन फरक पडला नाही. मलाही शंका होती, पण पत्रकारितेतील जबाबदारीही होती. वडील आईसोबत महापालिकेच्या सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये गेले. तिथला अनुभव खूपच वाईट होता, असे वडिलांनी सांगितले.
दुसऱ्या दिवशी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमागील मनपा शाळेतील केंद्रात गेलो. त्यांनी शंका व्यक्त केली. लगेच मी स्वब दिले. दुसऱ्या दिवशी प्रेसनोटमध्ये माझ्याच परिसरात, माझ्याच वयाचा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे दिसले. नावे नसल्याने फोन करुन खात्री केली. तो मीच असल्याचे कळले. आईचाही अहवाल पॉझिटिव्ह होता. लगेच मिनी घाटीत ऍडमिट झालो.
परिचारिका, सफाई कामगार, जेवण देणारे कर्मचारी यांचा खूप चांगला अनुभव आला. डॉक्टर दोन-तीन दिवसांतून एकदा येत. मी पत्रकार असल्याचे कळल्याने आमची अधिक काळजी घेण्यात आली. इतर रुग्ण त्यांच्या व्यथा सांगत होते. मधुमेह असलेल्यांना भात देणे, दुर्लक्ष असे प्रकार व्यथित करीत होते. एकाने तिथल्या दुरावस्थेचा व्हिडिओ दाखवला. मी रुग्णालयातूनच तो व्हायरल केला. मग रुग्णांची अधिक काळजी घेतली जाऊ लागली.
मी पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यावर परिसरातील काही राजकीय नेत्यांनी दिलासा, धीर देण्याऐवजी अफवा पसरवून नागरिकांत संभ्रम व भीती पसरवली. रुग्णालयात मला विचारणा झाली. मी माझ्या संपर्कात आलेल्यांची नावे सांगितली. त्यांचा शोध सुरू झाला. त्यातील अनेकांनी मलाच उलट विचारले, की आमची नावे का सांगितली? मी काही मित्रांना बोलून तपासणी करण्याचे सुचवले. त्यात तीन पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कातील काही, असे अनेक रुग्ण समोर आले. आमच्या भागातील आकडा वाढला. वेळीच तपासणी झाल्याने त्यातील बहुतेक जण बरे झाले. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी भान ठेवून वागावे, एवढीच अपेक्षा आहे. तुषार यांची ही भावना औरंगाबादकर, प्रशासन व राजकीय नेत्यांनी धडा घ्यावा, अशीच आहे.
तुषार वखरे, पत्रकार औरंगाबाद
