नाशिक|प्रतिनिधी| रशियात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले नाशिकचे पाच विद्यार्थी अडकून पडले होते, त्यांना भारतात येण्यासाठी तिकीट उपलब्ध होत नसल्याने ते चिंतीत होते. राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांना नाशिकचे रोहित अहिरे यांनी विद्यार्थ्यांची आपबिती सांगितली, त्यांनी भारतीय दूतावास आणि परराष्ट्रमंत्र्यांशी लगेच संपर्क साधला आणि त्यांच्या शिष्टाईमुळे अडकलेले विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले.
![]() |
| नाशिकचे विद्यार्थी सुखरुप मायदेशी |
भारतातून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. नाशिकचे देखील पाच विद्यार्थी रशियातील ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. अथर्व अनिल ततार (सटाणा ता. बागलाण), किर्ती चंद्रकांत रेनगाडे (उपेंद्रनगर, नाशिक), उन्नती योगेश माधरेले (जुने नाशिक), श्रेयश रसाळ आणि विश्वनाथ सपनार अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी लाॅकडाऊनमुळे रशियात अडकले होते, भारतात येण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत जी विमानसेवा सुरू होती, ती विद्यार्थ्याना मायदेशी परत आणण्यासाठी पुरेशी नव्हती, या विद्यार्थ्यांना विमानाचे तिकीट उपलब्ध होत नव्हते त्यामुळे ते सर्वजण चिंतेत होते. अडचण सांगावी तरी कोणाला आणि कोण परदेशात मदत करेल अशा विवंचनेत होते.
मात्र बागलाण तालुक्यातील विद्यार्थी अथर्व ततार यांना नाशिक जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रोहित अहिरे यांची आठवण झाली, मग व्हाॅट्स अॅप काॅलद्वारे त्यांना आपबिती कळवली आणि ते देवदुतासारखे मदतीला सरसावल्याने विद्यार्थ्यांच्या जीवातजीव आला, त्यांनी तातडीने सगळी घटना समजून घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली आणि यातून काय उपाययोजना करता येईल ते ठरवले.
त्याप्रमाणे सुप्रियाताई यांनी ट्वीटर तसेच फोनद्वारे भारतीय दूतावास आणि परराष्टमंत्री डॉ. एस जयशंकर आणि हरदिप कौर या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांना भारतात आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्याप्रमाणे अखेरीस सर्व गोष्टी लक्षात घेऊन बिषकेक, किर्गिस्तान (रशिया) येथे अडकलेल्या या सर्व पाच विद्यार्थींना भारतात येण्यासाठी तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले. खा. सुळे आणि अहिरे यांनी केलेल्या मदतीसाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आभार मानले तसेच या मदतकार्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रोहित अहिरे यांचे ही सर्वत्र कौतुक होत आहे.

