नाशिक|प्रतिनिधी| राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या पडळकरांविरूद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढत असून जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी तीव्र शब्दात पडळकर यांचा निषेध करुन आदरणीय पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा जिल्ह्यात फिरकू दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे.
![]() |
| पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष रा.यु. कॉ. |
पवार साहेब महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, असं वक्तव्य करून आमदार पडळकर यांनी नवा वाद उपस्थित केला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे.
कडलग म्हणाले की, एकीकडे देशाचे पंतप्रधान यांच्यासह सर्वच राजकिय पक्ष एकत्र येऊन या महामारी विरुद्ध लढा देत आहे. अशा परिस्थितीत असे वक्तव्य करणे बालिशपणाचे लक्षण आहे. आम्ही पालकमंत्री ना. छगन भुजबळ, ना अजितदादा पवार, ना. जयंत पाटील साहेब यांच्या तालमीत तयार झालेलो कार्यकर्ते आहोत. आम्ही आमची संस्कृती जपतो मात्र वेळ पडली तर ठोशास ठोसा देणेही जाणतो, त्यामुळे आपली पातळी ओळखा आणि आम्हाला ज्ञान पाजळू नका, तसेच शरद पवार यांची माफी मागा अन्यथा नाशिक जिल्ह्यात फिरकू देणार नाही असा इशारा ही कडलग यांनी दिला आहे.
देवळा राष्ट्रवादीतर्फे पडळकरांचा निषेध
खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा देवळा तालुका आणि शहरातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
खा. शरदचंद्र पवार साहेब हे देशातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. देशावर राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी नेहमीच सक्षमपणे भूमिका मांडून संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ही पवार साहेबांनी केलेल्या विविध कामाबद्दल देशातील जनतेसमोर स्तुती केलेली आहे , अखंड ५० वर्षे त्यांनी देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे.
आ. गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करून आपला बालिशपणा जनतेसमोर उघड केला आहे.
पवार साहेबांनी कधीच जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं आहे.भाजप पक्षाने आशा लोकांना समज द्यावी तसेच पवार हे आजच्या पिढीला एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी देशाचे जाणतेराजे शरदचंद्रजी पवार साहेब यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देवळा राष्ट्रवादी तर्फे करण्यात आलीय.
